करडी/पालोरा : करडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या व्हरांड्यात आज १ डिसेंबर रोजी दुपारी तहकुब ग्रामसभेचे आयोजन झाले. ग्रामसष्भा सुरु असताना सरपंच सिमा सियाराम साठवणे यांनी क्रिडांगण सपाटी करणाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या मुकेश आगासे या तरुणाला सभेत मारहाण केली. सदस्यान व ग्रामस्थांनी सरपंचाच्या कृत्याचा विरोध करीत ठराव पारित केला. प्रकरणी दोन्ही बाजुने करडी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली.करडी येथील ग्रामसभा नेहमी गाजत असते. यावेळी विषयावर न गाजता ती मारहाण प्रकरणाने गाजली. करडी ग्रामपंचायत कार्यालयात विषय सुचीनुसार तहकूब ग्रामसभा आज दुपारी सरपंच सिमा साठवणे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामविकास अधिकारी, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थित घेण्यात आली. विषय संपल्यानंतर मुकेश श्रीराम कापगते या तरुणाने गोटाळी क्रिडांगणावरील सपाटीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्या मुद्दयावर सदस्य भाऊराव साठवणे यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र सरपंचानी क्रोधीत होऊन तरुणाला मारहाण केली. यात तो जखमी झाला. यावेळी सदस्या संध्या तुमसरे यांनी मध्यस्थी केली. दोषी सरपंचावर कारवाई करण्यासाठी सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकाऱ्यामार्फत ठराव लिहून बहुमताने मंजूर केला. दोन्ही बाजूने नागरिक एकमेकाविरुध्द उभे ठाकून बाचाबाची सुरु असतांना पोलिस शिपाई गौतम यांनी नागरिकांना समजावून शांत केले. प्रकरणी दोन्ही बाजुने करडी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. (वार्ताहर)
महिला सरपंचाची तरुणाला मारहाण
By admin | Updated: December 1, 2014 22:49 IST