भंडारा : अनेक गावांमध्ये मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. गाव विकासासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेतल्यास गावात विकास होऊ शकतो. यासाठी आपण पुढाकार घेऊन समस्या मार्गी लावणार आहेत. असे प्रतिपादन भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.
भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथील दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानंतर ते बोलत होते. यावेळी सरपंच मनिषा वासनिक, उपसरपंच संदीप खंडाते, सदस्य ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे, वृषाली शहारे, संगिता बोरकर, ग्रामसेवक पी.एन. चेटुले, तलाठी बांबोर्डे, पोलीस पाटील संघदीप भोयर, विनोद कोटवार, रुस्तम टेंभूर्णे, शेषराव शेंडे, राजेश सार्वे, बाबुलाल वासनिक आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी समस्यांचे निवेदन आमदार भोंडेकर यांना सोपविले. निवेदनात खुटसावरी व पिंपळगाव येथे स्मशान शेड व सभामंडप जनसुविधा अंतर्गत मंजूर करण्यात यावे, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये शासनाकडून देण्यात यावे, खुटसावरी गावाला जागेचा अभाव असल्याने अनेक शासकीय योजना परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे खुटसावरीच्या इंदिरा नगर लगत असलेल्या रिठी गाव चिखली हमेशा येथील राखीव जागा खुटसावरीला हस्तांतरण करण्यात यावी, येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ भाड्याच्या घरात आहे. त्यामुळे त्या दवाखान्यासाठी इमारत बांधकाम करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासह मुलभुत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या आदी मागण्यांचा समावेश होता. यावेळी भोंडेकर यांनी स्मशानभुमीचे बांधकामासाठी काही अडचण असल्यास त्या अडचणी सोडविण्यास येतील. वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना येत्या आठ-दहा दिवसात भरपाई देण्यात येईल. जागेची कमी लक्षात घेता रिठी गावातील जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन भोंडेकर यांनी दिले.
गावात समस्याच समस्या
गावाच्या सभोवताल असलेल्या अनेक गावांमध्ये स्मशानभूमी आहे. मात्र खुटसावरी व पिंपळगाव येथे स्मशानभूमी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या गावात राज्य शासनाच्या पशुसंवर्धन दवाखाना आहे. मात्र सध्या तो भाड्याच्या घरात आहे. अनेक योजनांसाठी जमीन उपलब्ध नसल्याने अनेक बांधकाम परतीच्या मार्गावर आहेत. रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्ता दुरुस्तीकडे अनेक वर्षापासून शासन प्रशासनाकडुन पाठ दाखविली जात आहे. खुटसावरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळगाव येथे १४ वर्षापासून पोलीस पाटील पद रिक्त आहे. टोलीवर पाण्याची बिकट समस्या असून येथे जलकुंभ नसल्याने प्रत्येकाला पाणीपुरवठा होत नाही. यासह गावात सौंदर्यीकरणाचा अभाव आहे.