भंडारा : खासगी स्वयंसेवी संस्थेद्वारा अस्थिव्यंग मतिमंद, मुकबधीर, कर्णबधीर व अंध अशा अपंगाच्या विशेष निवासी, अनिवासी शाळा कर्मशाळा राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविल्या जातात. मात्र या संस्था मागील १३ वर्षांपासून विनाअनुदान तसेच कायम विनाअनुदान तत्वावर अपंगाची सेवा करीत आहेत. या शाळा, कर्मशाळांना शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. या अपंगाच्या शाळा, कर्मशाळेतील संस्थाचालक व कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. शासनाच्या 'अच्छे दिन' या अपंगाच्या विशेष शाळा कर्मशाळांना कधी येणार, असा प्रश्न संस्थाचालक व कर्मचारी करीत आहेत. या अपंगाच्या विशेष शाळा कर्मशाळा अपंग कल्याण आयुक्ताकडून मान्यता प्राप्त आहेत. राज्यात ८८७ अपंगाच्या विशेष शाळा कर्मशाळा अनुदानापासुन वंचित आहेत. तर जिल्हयातील २९ शाळांपैकी १९ शाळा कायम विनाअनुदानीत आहेत.शासन शिक्षण, कौशल्य शिक्षण, तसेच व्यवसायभिमूख प्रशिक्षााचा बोजवारा करीत असतांना विशेष मुलांना शिक्षण, प्रशिक्षण देणाऱ्या तसेच त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या अपंगाच्या शाळा कर्मशाळांना गेल्या १३ वर्षापासून अनुदानाचे सर्व निकष पुर्ण करणाऱ्या संस्थांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचारी व संस्थाचालक आर्थिक विवंचनत सापडले आहेत. अपंगाच्या संस्थाना अनुदान नसल्यामुळे विशेष विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या निवासाच्या आरोग्याच्या व त्यांच्या पुनर्वसनाच्या सर्व खर्च संस्थाचालकाला सोसावा लागत आहे. अनुदानाच्या मागणीसाठी तसेच कायम विनाअनुदानीत शाळा कर्मशाळांतील कर्मचाऱ्यांना संथ मान्यता व आकृतीबंध मान्यता मिळण्यासाठी व अनुदानीत शाळा कर्मशाळांतील अतिरिक्त कंत्राटी मानधनावरील तसेच संस्थेवरील कर्मचाऱ्यांना पदनामाप्रमाणे वेतन श्रेणी वर कायम करण्यासाठी प्रादेशिक अपंग शाळा कर्मचारी संस्थाचालक संघटनेच्या वतीने शाळा कर्मशाळा बंद साखळी उपोषण १२ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु आहे. गणेश हुकरे, देवील नेपाले, फिरोज खान पठान, रविन मत, प्रमोद साखरे यांच्या नेतृत्वात उदय माथुरकर, नासीर पठाण, कैलास गेडाम, बन्सोड आदी कर्मचारी व संस्थाचालक साखळी उपोषण करीत आहेत.या आंदोलनामुळे जिल्हयातील १,४०० अपंग विद्यार्थी शिक्षण व प्रशिक्षणापासुन वंचित झाले आहेत. त्यामुळे या विशेष विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेता शाळा कर्मशाळांना तात्काळ अनुदान दयावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवीलाल नेपाले यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
‘अच्छे दिन’ कधी येणार?
By admin | Updated: January 18, 2015 22:39 IST