करमुडा येथील प्रकार : प्रकरण रोजगार सेवकाला हटविण्याचेतुमसर : ग्रामरोजगार सेवकाला पदावरुन हटविण्याकरिता कुरमुडा ग्रामपंचायतने ठराव घेतला. मात्र त्या ठरावाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. परिणामी खासदार नाना पटोले यांच्या जनता दरबारात प्रश्न उपस्थित केला असता सात दिवसाच्या आत कारवाईचे आदेश देण्यात आले. मात्र अधिकाऱ्यानी आदेशाची अवहेलना केल्यामुळे सरपंचाच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकले.तुमसर तालुक्यातील कुरमडा या आदिवासीबहुल गावात ग्रामरोजगार सेवक कामात हयगय करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची मजुरी वेळेत न मिळणे, हजेरीपटावर हजेरी न लावणे, मजुराकडून पैशाची मागणी करणे आदी तक्रारी वाढल्यामुळे रोजगार सेवकाविरुध्द ग्रामपंचायतमध्ये ठराव पारित करण्यात आला. या ठरावाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे २३ फेब्रुवारी रोजी खासदार नाना पटोले यांच्या आयोजित केलेल्या जनता दरबारात कुरमुडाच्या सरपंचा अंतकला कोडवते यांनी रोजगार सेवकाला हटविण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी खासदार पटोले यांनी सात दिवसाच्या आत रोजगार सेवकाला हटविण्यात येईल, असे आश्वासन देऊन कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. मात्र एक महिन्याचा कालावधी लोटूनही रोजगार सेवकाला हटविण्यात आले नाही. खासदाराच्या आदेशाची अवहेलना होत असेल तर सामान्यांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उपस्थित करुन सरपंच व सदस्याच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी कुरमुडा ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून ठोकण्याचा निर्णय घेतला. (शहर प्रतिनिधी)
सरपंचच ग्रामपंचायतला कुलूप ठोकतो तेव्हा...
By admin | Updated: March 23, 2017 00:20 IST