मोहाडी : प्रत्येक आठवडी बाजारातून आता वजने गायब झाली आहेत. त्याऐवजी चक्क दगड, आलू, कांदे आदी जिन्नसांचा वापर वजन म्हणून केला जात आहे. यातून ग्राहकांची फसवणूक होत असतानाही वजन व मापे विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.बाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली जाते. त्याचवेळी नकळपतणे जादुई पद्धतीने फसवणूक केली जाते, हे ग्राहकांच्या लक्षात येत नाही. या भावबाजीतून ग्राहकाला क्षणभर पैसे कमी झाल्याचे समाधान मिळते. मात्र त्यातून आपली फसगत होते, हे कळत नाही. आठवडी बाजारात ‘दांडी’ मारण्याचा प्रकार सर्रास सुरू असतो. सर्वच आठवडी बाजारात हीच स्थिती आहे. आठवडी बाजारात किरकोळ व्यापारी लांबवरून जातात. त्यांना वजन व माप दर दोन वर्षातून एकदा संबंधित विभागाकडून प्रमाणित करवून घ्यावे लागते. मात्र आठवडी बाजारात जाणारे छोटे व्यापारी वजन व मापे नियमाप्रमाणे दर दोन वर्षांनी प्रमाणित करीत नाहीत. संबंधित वजन मापे विभागाकडून त्यांची कधी चौकशीही होत नाही. त्यामुळे ते आता निर्ढावलेले आहेत. परिणामी ते वस्तू मोजण्यासाठी खुलेआम दगड, बटाटे, कांदे आदींचा वापर करताना दिसून येत आहेत.अनेक किरकोळ व्यापारी मागील अनेक वर्षांपासून तीच ती वजन व मापे वापरतात. त्या वजन व मापाची झीज होऊन त्याचे वजनही कमी होते. त्याच वजन व मापांनी वस्तू मोजून ग्राहकांच्या माथी मारली जाते. ग्राहकाने एक किलो वस्तूची किंमत विक्रेत्याला दिली, तरी त्या वस्तूचे वजन अनेकदा किलोपेक्षा कमीच असते. त्यातच आठबाजारातील काही विक्रेते ‘दांडी’ मारण्यात चांगलेच पटाईत असतात. त्यांच्याजवळ प्रमाणित केलेले वजन, तर सोडाच दुसरेही पयार्यी वजन व माप नसते. वस्तू तोलताना ते प्रचंड हातसफाई करतात. प्रमाणित तराजूला एक खास दांडी लावून हातसफाई केली जाते. कोणत्याही वस्तूचे वजन करताना ग्राहकांचे लक्ष पारड्यावर असते. हीच संधी साधून विक्रेता ज्या पारड्यात वस्तू ठेवतो, त्या बाजूला पारडे झुकवून कमी वजनाची वस्तू ग्राहकाच्या माथी मारतो. ग्राहकांचे लक्ष नाही, हे बघताच तराजूची दांडी वरील बाजूला लटकवून अलगदपणे तो कमी वजनाची वस्तू ग्राहकाला देतो. आठवडी बाजारातील विक्रेते अशा अनेक ‘टॅक्ट’ वापरून वजनात हेराफेरी करतात. सध्या तर बाजारात ‘डुप्लीकेट’ वजन मापेही दिसून येतात. वजनावर एक किलो असे नमूद असते, प्रत्यक्षात त्याचे वजन ८०० ग्रॅमच असते. बरेचदा दुकानातील वस्तूपेक्षा आठवडी बाजारातील वस्तू स्वस्त असण्याचे हे एक कारण असते. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील आठवडी बाजारातून वजने गायब
By admin | Updated: March 25, 2015 00:47 IST