तुमसर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातील व्हरांड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात जाताना साचलेल्या पाण्यातून जावे लागते. कार्यालयीन इमारतीत पाणी साचत असल्याने, अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे पाणी समोरच्या लोखंडी ग्रिलमधून येत आहे की, इमारतीच्या छतातून येत आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दुय्यम निबंधक कार्यालय व इतर कार्यालयात जाताना या पाण्यातून सर्व नागरिकांना जावे लागते. मंगळवारी एक वयोवृद्ध नागरिक पाण्यातून जाताना त्यांच्या पाय घसरला होता. थोडक्यात ते बचावले. पाणी साचले जागा सिमेंट काँक्रिटची असल्यामुळे ती निसरडी होते. तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात कूलरसह इतर साहित्य ठेवलेले आहेत. त्यांचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होतो. कार्यालय प्रशासनाने येथे दखल घेण्याची गरज आहे.
तहसील कार्यालयाच्या मागे नवीन तहसील कार्यालयासोबतच इतर कार्य याकरिता मोठी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सदर काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून इमारत बांधकाम सुरू आहे, परंतु सदर इमारतीचे बांधकाम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. तहसील कार्यालयाची इमारत जुनी आहे. त्यामुळे प्रशासनाने नवीन इमारतीत तहसील कार्यालय स्थानांतर करण्याची गरज आहे.