तुमसर : शासनाने आधारभूत केंद्राच्या माध्यमातून रब्बी (उन्हाळी) धानाचे पीक खरेदी केले होते सदर पिकाची खरेदी होऊनसुद्धा २ महिन्यांच्याही वर काळ झाला मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना धानाचे चुकारे व पूर्ण बोनस मिळालेला नाही. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी लावलेली शेती वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले शासनाने तत्काळ धानाचे चुकारे ३१ ऑगस्टपर्यंत करावे अन्यथा दि १ सप्टेंबर रोजी बावनथडी प्रकल्पात शेतकरी सामूहिक जलसमाधी घेतील असा निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
शासनाने उन्हाळी धान खरेदी करून अजूनपर्यंत शेतकऱ्यांना धानाचे चुकारे दिले नाही. बोनसची ही अर्धीच रक्कम शेतकऱ्यांना दिली त्यामुळे शेतकऱ्यांनी उधार उसने व सावकाराकडून कर्ज काढून कसेबसे पावसाळी धानाचे रोहने लावले आहेत; मात्र आता कीटकनाशक औषध व खत या करिता शेतकऱ्यांकडे रोकड पैसे नाहीत. धान पीक वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.
आधीच शेतकऱ्यांना धानाचे ५० टक्के बोनस देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे व आता रोवणी झालेले धान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात दमडी ही नसल्याने शेतकऱ्यांचे कमरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना रब्बी (उन्हाळी) धानाचे चुकारे व राहिलेला ५० टक्के बोनस शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यावर आलेले संकट दूर करावे, अशी मागणी करून दि ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास दि. १ सप्टेंबर रोजी परिसरातील शेतकरी मिळून बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा तोफलाल रहांगडाले व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.