तुमसर : कार्यक्षम प्रशासनाचा दावा करणाऱ्या वनविभागाअंतर्गत येणाऱ्या जांब कांद्री वनपरिक्षेत्रातील मग्रारोहयो अंतर्गत सुमारे १०० मजुरांची मजुरी दोन वर्षापासून मिळाली नाही. सात दिवसात व्याजासहित मजुरी न मिळाल्यास दि. १६ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच ईश्वरदयाल बंधाटे यांनी दिला आहे. तुमसर तालुक्यातील मौजा मंगरली, रोंघा या आदिवासी बहुल गावातील वनपरिक्षेत्रात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत डिसेंबर सन २०१२-२०१३ मध्ये वृक्षाकरिता खड्डे खोदणे, पट विडींग व वृक्ष लागवडीची कामे सुमारे १०० मजुरांनी केली होती. परंतु या मजुरांना अद्याप वनविभागाने मजुरी दिली नाही. तुमसर तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम मंगरली व रोंघा या गावाचा समावेश होता. येथील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे जांब कांद्री वनपरिक्षेत्रांतर्गत सुरु करण्यात आली. गट क्रमांक ४० व ४१ मौजा मंगरली येथे खड्डे खोदणे, पटा विडींग व वृक्ष लागवडीचे कामे मंगरली व रोंघा येथील १०० मजुरांनी डिसेंबर २०१२ ते एप्रिल २०१३ पर्यंत केले होते. परंतु आजपर्यंत त्या मजुरांना मजुरी मिळाली नाही. शासनाच् या नियमानुसार १५ दिवसात मजुरी देण्याचा कायदा आहे. दोन वर्षापासून मजुरांना येथे मजुरीची प्रतीक्षा आहे.सात दिवसात मजुरांची मजुरी न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर दि. १६ फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच ईश्वरदयाल बंधाटे यांनी दिला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीची चौकशी करून कारवाईची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
१०० मजुरांना दोन वर्षांपासून मजुरीची प्रतीक्षा
By admin | Updated: February 8, 2015 23:28 IST