व्यथा साकोली तालुक्याची : १७ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रात रोवणी, उत्पादनाची आशा धुसर संजय साठवणे साकोली तालुक्यातील १८ हजार १७८ हेक्टर या एकुण धानलागवडीखालील क्षेत्रापैकी १७ हजार ७७८ हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. १५५५ हेक्टर क्षेत्रात आवत्या टाकण्यात आल्या आहेत. एकंदरीत निर्धारीत रोवणीचे क्षेत्र पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असून साकोली तालुक्यात ९९.४१ टक्के रोवणी पूर्ण झाली असली तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांच्या अधिक उत्पन्नाच्या आशा धुसर झाल्या आहेत. साकोली तालुक्यातील सानगडी, एकोडी व साकोली ही मोठी गावे असून या गावपरिसराला अनेक छोटी छोटी गावे जुळून आहेत. तालुक्यात ६० टक्के शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर शेती करतात. तर उर्वरीत शेतकरी यांचेकडे मोटारपंपाची सोय आहे. मागील तीन वर्षापासून सतत दुष्काळ पडत असल्याने तालुक्यातील शेतकरी पुरता हादरुन गेला आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांच्या केलेल्या कामाचा मोबदला म्हणून निसर्गानेही चांगलीच साथ दिली. मान्सूनच्या आगमनानंतर १७ व २३ जून या कालावधीत तालुक्यात पाण्याने दमदार हजेरी लावली होती.परंतु त्यानंतर निसर्गाची वक्रदृष्टी तालुक्याभर पडली आणि पाऊस बेपत्ता झाला. तब्बल २५ दिवस पावसाचा थांगपत्ता नव्हता. मोटारपंपाने पाणी देऊन पिक जगविले. त्यानंतर कमीअधिक प्रमाणात आलेल्या पावसाने दिलासा दिला. या पावसाने ओल्या झालेल्या जमिनीवर कोरडवाहू शेतकऱ्यांनी चिखलणी करून रोवणी आटोपली. काहींनी तशी शंभर ते दोनशे रुपये मोजून मोटारपंपाने रोवणी केली. गुत्यापोटी हेक्टरी अडीच ते तीन हजार रुपये मोजले. त्यामुळे तालुक्यातील १८ हजार १७८ हेक्टर क्षेत्रापैकी १७ हजार ७७८ हेक्टरवर धानाची रोवणी करण्याचे उद्दीष्ट्ये गाठता आली. धानाच्या लागवडीखाली अतोनात खर्च झाला असताना वेळोवेळी हवामान खात्याचा अंदाज चुकून पाऊस दगाफटका देत आहे. त्यामुळे शेतातील उभे पिक पिवळसर पडून करपायला लागले आहे. या पिकाकडे पाहून शेतकरी डोळ्यातून अश्रू ढाळत पाऊस पडावा म्हणून देवाला याचना करीत आहेत.
१,५५५ हेक्टरवरील आवत्यांना पावसाची प्रतीक्षा
By admin | Updated: August 28, 2015 01:07 IST