दारूबंदी ठरावाला पाठिंबा : पोलिसांविरुद्ध ग्रामस्थांचा रोषचिचाळ :पवनी तालुक्यातील नवेगाव (पाले) या गावात दारू विक्रेत्यांनी सर्रासपणे दारू विकणे सुरू केले आहे. त्यामुळे गावातील शाळकरी मुले दारू व सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. गावातील बऱ्याच घरचे संसार उदध्वस्त होत आहे. या दारू विक्रेत्यांना अद्दल घडविण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन दारूबंदीची मागणी केली आहे.भंडारा-पवनी मार्गावर वसलेल्या अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोसे बिटमधील नवेगाव पाले या गावात दारूचे परवानाधारक दुकान नाही. येथे मागील ६ वर्षापासून दारू व सट्टापट्टीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. संबंधित पोलीस ठाण्यात अनेकदा सांगुनही पोलीस कारवाई करण्यासाठी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थानी अखेर ७ आॅक्टोबरला ग्रामपंचायत व ग्रामस्थानी ग्रामसभा घेऊन अवैध धंदे बंद करण्याचा ठराव घेतला. या ग्रामसभेत अवैध व्यवसायिकांचे नावानिशी अर्ज देऊन बोलाविण्यात आले. पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. सभेत दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र पोलिसांना अवैध व्यवसायीकांचे नावे सांगूनही पोलीस या अवैध व्यवसायाकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, खासदार नाना पटोले, आमदार रामचंद्र अवसरे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. निवेदन देताना सरपंचा शिल्पा बारसागडे, उपसरपंच गिरधर कोहपरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विलास भोयर, पंचयत समिती सदस्य तुळशिदास कोल्हे आदींचा समावेश होता. (वार्ताहर)
नवेगाव येथे दारूबंदीसाठी ग्रामस्थांचा एल्गार
By admin | Updated: October 24, 2015 02:52 IST