साकोली : अनेक वाहनांमध्ये इंधन म्हणून सर्रास रॉकेलचा वापर होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. सध्या ग्रामीण व शहरी भागात आॅटोंची संख्य प्रचंड वाढली आहे. सोबतच ग्रामीण भागात आता मोठया प्रमाणात ट्रॅक्टरचा वापरही वाढला आहे. बैलजोडीऐवजी आता ट्रॅक्टरनेच मशागतही केली जात आहे. ग्रामीण भागातील आॅटो व ट्रॅक्टर चालक खेड्यातील विक्रेत्यांना जादा पैसे देऊन रॉकेल घेतात. तेच रॉकेल इंधन म्हणून आॅटो, ट्रॅक्टरमध्ये वापरले जात आहे. या वाहनांमधून निघणाऱ्या रॉकेलच्या धुरामुळे आता नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.आॅटो आणि ट्रॅक्टर डिझेलवर चालतात. मात्र दिवसेंदिवस डिझेलच्या किमती वाढत असल्याने विविध वाहनांमध्ये इंधन म्हणून रॉकेलचा वापर केला जात आहे. ट्रक, ट्रॅक्टर आणि आॅटो त्यात आघाडीवर आहेत. ग्रामीण भागात केरोसिन विक्रेते सामान्य जनतेला रॉकेल नसल्याचे सांगून त्यांच्या वाट्याचे रॉकेल अशा वाहनधारकांना विकत असल्यो चित्र आहे. इंधन म्हणून रॉकेलचा वापर करणाऱ्या अशा वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांना दमा व श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. डिझेलचे दर सतत वाढत असल्याने या वाहनधारकांनी आता रॉकेलकडे धाव घेतली आहे. डिझेलपेक्षा रॉकेल स्वस्त दरात उपलब्ध होते. रॉकेल विक्रेतेही सामान्य ग्राहाकांपेक्षा त्यांच्याकडून दोन पैसे जास्त मिळत असल्याने त्यांना सहज रॉकेल उपलब्ध करून देतात. सामान्य जनतेला मात्र हक्काचे रॉकेल मिळणे कठीण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
वाहनांमध्ये रॉकेलचा वापर
By admin | Updated: April 21, 2016 00:36 IST