लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांसह भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हवामान खात्याने जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता. शुक्रवार ते रविवार दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मंगळवारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा व मका या पिकांना फटका बसला. पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला पिकांना बसला. जिल्ह्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, पावसाने भाजीपाला उत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले, तर शासकीय धान खरेदी केंद्रांवर खरेदी केलेले २९ लाख क्विंटल धानसुद्धा उघड्यावर पडलेले असून, या धानालाही काही प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. पुन्हा पाऊस झाल्यास पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.