लोकमत न्यूज नेटवर्कवरठी (भंडारा) : सॅनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी वरठी येथील ब्राईट बार विभागात झालेल्या अपघातात दोन मजूर जखमी झाले. सदर घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. क्रेनच्या साहाय्याने सामान स्थलांतरित करण्याकरिता लावण्यात आलेल्या पुल्लीचे वायर तुटल्याने ती मजुरांच्या अंगावर पडल्याने सदर दुर्घटना घडली.
कंत्राटी कामगार आशिष लिल्हारे व मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी बादल झंझाड हे सकाळ पाळीत ब्राईट बार विभागात इलेक्ट्रिकलचे काम करीत होते. या विभागात एका ठिकाणाहून दुसरीकडे वजनी सामान नेण्याकरिता क्रेनचा वापर होतो. अचानक सामान वाहून नेणाऱ्या क्रेनच्या पुल्लीचे वायर तुटल्याने हुकासह पुल्ली मजुरांच्या अंगावर पडली. एकाच्या डोक्यावर पडून सोबत काम करीत असलेल्या दुसऱ्या मजुरांच्या पायावर आदळली. यात एका मजुरांच्या डोक्याला दुखापत झाली असून दोन्ही मजुरांचे पायाचे हाड मोडल्याची माहिती आहे. कंपनी व्यवस्थापनाने अजूनही अधिकृत माहिती दिली नसल्याने परिसरात नानाविध चर्चा रंगल्या होत्या.
दोन्ही जखमी मजुरांना कंपनी व्यवस्थापनाने भंडारा येथील लक्ष हॉस्पिटल येथे दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. व्यवस्थापनाचे अधिकारी व सॅनफ्लॅग कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.
प्रकृती धोक्याबाहेरदोन्ही जखमी मजुरांची प्रकृती धोक्याबाहेर असून एका मजुरांच्या उजव्या पायाला व दुसऱ्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर असल्याची माहिती कंपनी व्यवस्थानाने दिली. डोक्याला किरकोळ मार असल्याची माहिती असून दवाखान्यात दोन्ही मजुरांच्या डोक्याचे एमआरआय व सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले.