नेरला येथील घटना : घराचे नुकसानअड्याळ : वादळी वाऱ्यासह अकस्मातपणे आलेल्या पावसादरम्यान एका घरावर वीज कोसळली. या घटनेत सुदैवाने आईसह तिच्या दोन मुली बचावल्या. ही घटना पवनी तालुक्यातील नेरला येथे आज मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. महेंद्र संपत मेश्राम असे घरमालकाचे नाव आहे.मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस बरसला. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान अवकाळी पावसात मेश्राम यांच्या घरावर वीज कोसळली. घटनेच्यावेळी महेंद्र मेश्राम यांच्या पत्नी मंदा व त्यांच्या दोन्ही मुली घरी होत्या. वीज घराच्या कौलारू भागातून प्रवेश करून सरळ जमिनीत शिरली. यात मायलेकींना किरकोळ दुखापत झाली. नेरला येथील सरपंच कोदाने यांनी जखमींवर ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे दाखल करण्यात आले. घराच्याबाजूला असलेल्या गोठ्यात गाय बांधली होती. मात्र गाईला कुठलीही दुखापत झाली नाही. मेश्राम यांच्या घरावर वीज पडल्याचे माहित होताच शेजाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेने मेश्राम कुटूंबिय हादरले होते.या घटनेत मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी सरपंचासह ग्रामस्थांनी केली आहे. परिसरात आलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
घरावर वीज कोसळली आईसह दोन मुली बचावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 08:30 IST