देवानंद नंदेश्वर भंडाराप्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा बसस्थानकात आगमन होणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असून अनेकांना जीव टांगणीत ठेवून प्रवास करावा लागत आहे. येथे उपलब्ध करून देण्यात आलेली तोकडी सुरक्षा प्रवाशांच्या सुरक्षीततेची उणीव दिसून येत आहे. ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमिवर बसस्थानकाच्या सुरक्षाविषयी आढावा घेण्यात आला.जिल्ह्याचे स्थान असलेल्या भंडारा बसस्थानक शेजारील छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांना जोडणारा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. भंडारा बसस्थानकातून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. इतर राज्यातून ये- जा करणाऱ्यांना भंडारा शहरातुनच जावे लागत असल्याने दररोज तीन ते चार हजार प्रवाशी विविध ठिकाणी प्रवास करतात. भंडारा स्थानकात एकुण १४ प्लेटफॉर्म असून सण उत्सवात स्थानक परिसर प्रवाशांनी खचाखच भरलेला असतो. प्रवाशांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल परिवहन महामंडळाला होते. मात्र भंडारा बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची सुरक्षेतेची जबाबदारी बस स्थानक प्रशासनाची असतांना भंडारा बसस्थानकात मात्र सुरक्षेचा अभाव दिसून येतो. सुरक्षतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असणारे सीसीटीव्ही स्थानक परिसरात नसल्याने या ठिकाणची सुरक्षा राम भरोसेच आहे का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. भंडारा बसस्थानक प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे सामान्य प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. बसस्थानकातून अनेकवेळा पाकिटमारी झाली असून लाखोंचा ऐवज लुटला गेला आहे. मात्र या गोष्टीचा प्रशासनाला कोणताही सोयीसुतक नसल्याने स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दररोज हजारो प्रवाशी या स्थानकातून ये-जा करीत आहे. दोन ते तीन वर्षांपुर्वी प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी बसस्थानकात पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. सुरक्षेची जबाबदारी एका पोलिस शिपायाकडे देण्यात आली होती. आज दुपारी सदर प्रतिनिधीने बसस्थानक परीसरात फेरफटका मारला असता 'मेस्का'चे दोन सुरक्षा रक्षक पार्सल विभागाच्या आवारात दिसून आले. पोलीस चौकीचे 'शटर' काही अंतरापर्यत उचलले होते. या चौकीत खुंटीला शर्ट अडकवून ठेवलेले दिसून आले. एकही सुरक्षा रक्षक त्यावेळी दिसून आले नाही. बसस्थानकात १४ प्लेटफार्म आहेत. गाड्यांची मोठी रेलचेल असते. जिल्हास्तरीय बसेस तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी बसेसची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. मात्र प्रवाशांच्या सुरक्षितेचे तीनतेरा नेहमीच वाजलेले असतात. भंडारा बसस्थानक प्रशासनाच्या कारभारामुळे प्रवाशांना नाहक अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकात पुरुष प्रवाशांबरोबर अनेक महिला प्रवाशीही याठिकाणाहून प्रवास करतात. मात्र महिला प्रवाशांसाठी याठिकाणी एकही महिला पोलिस उपलब्ध नाहीत. भंडारा बसस्थानकाला अनेक समस्यांनी घेरले आहे. अवैध प्रवाशी पाकिटमारी, घाणीचे साम्राज्य, यासह बसस्थानकात दर सहा महिन्यात रस्त्यांची डागडुगी करण्यात भंडारा स्थानक धन्यता मानत आहे. बसस्थानकाची सुरक्षतेची जबाबदारी स्थानिक प्रशासन घेत नसून प्रवाशांना सुरक्षितेचे कोणतेही ठोस उपाय प्रशासनाकडुन होतांना दिसत नाही. बसस्थानकात सीसीटीव्ही असणे आवश्यक असतांना पोलिसांची संख्याही वाढविणे आवश्यक आहे. यामध्ये महिला पोलिसांनाही स्थानक परिसरात जवाबदारी देणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)
बसस्थानकात प्रवाशांच्या 'सुरक्षा' चे तीनतेरा
By admin | Updated: March 4, 2016 00:48 IST