लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : आंतरराष्ट्रीय सायकलपटू व ज्युनीअर आशियाई चॅम्पीयनशिप स्पर्धेत ब्रांझ पदक विजेती सुशिकला दुर्गाप्रसाद आगासे रा. निलज हिची जर्मनी येथील तीन महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी भारत सरकारद्वारे निवड झाली आहे. ३१ मे ते २९ आॅगस्ट २०१७ पर्यंतच्या प्रशिक्षणासाठी ती रवाना झाली आहे. जर्मनीतील प्रशिक्षण शिबिरात ती सन २०१८ मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ व आशियाई सायकलींग स्पर्धेची तयारी करणार आहे.सुशिकला आगासे हिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. ६ ते १० फेब्रुवारी २०१७ दरम्यान भारतीय सायकलींग महासंघाचे वतीने नवी दिल्ली येथील यमूना वेलोट्रमध्ये सहभागी होत महिलांच्या ज्युनिअर टीम स्पिंट प्रकारात ३६.६४३ सेकंदाची वेळ नोंदवून एशियन सायकलींग अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदक जिंकले होते.भारताला तीन वर्षानंतर ज्युनिअर आशियाई चॅम्पीयनशिप स्पर्धेत तिच्या मेहनतीच्या भरवश्यावर ब्रांझ पदक मिळाले तर महाराष्ट्राला पहिल्यांदाच पदक मिळाले होते. मोलम जुरी करणारे दुर्गाप्रसाद आगासेंची मुलगी सुशिकलाने केवळ मेहनत व योग प्रशिक्षकांच्या भरवश्यावर तिने मारलेली मजल वाखन्याजोगी आहे.
सायकलपटू सुशिकला घेणार जर्मनीत प्रशिक्षण
By admin | Updated: May 25, 2017 00:19 IST