तुमसर : रेल्वे फाटकावरील ट्रॅकवर सिमेंट वाहून नेणारा ट्रेलर अचानक बंद पडला. यामुळे दोन प्रवासी एक्स्प्रेस गाड्या आऊटरवर थांबविण्यात आल्याने रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाला. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.सिमेंट वाहून नेणारा ट्रेलर एम एच ३४ एबी ९७३० मध्ये अचानक तांत्रिक बिघाड आल्याने तो तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे फाटक ५३२ वर बंद पडला. यामुळे कॅबीन स्विचमैन यांनी स्टेशन प्रबंधकांना सूचना दिली. रेल्वेचे अधिकारी तथा कर्मचारी फाटकाकडे निघाले. महाकाय ट्रेलर पाहून अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. रेल्वे ट्रॅक बाहेर याला काढावे कसे याचा प्रश्न त्यांना पडला. ट्रेलर चालकाने शर्थीचे प्रयत्न केल्यावरही ट्रेलर चालू झाला नाही. ट्रेलर चालकानेच आपल्या दुसऱ्या साथीदाराला ट्रेलर घेऊन परत येण्यासा सांगितले. दुसरा ट्रेलर अर्ध्या तासाने आला. विरुध्द दिशेने बंद ट्रेलरला धडक दिल्यावर तो रेल्वे ट्रॅकबाहेर निघाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास घेतला. ट्रेलर चालकावर रेल्वे प्रशासनाने गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास रेल्वे सुरक्षा बळाच्या उपनिरीक्षक उषा बिसेन करीत आहे. तुमसर रोड रेल्वे फाटकावर मेगाब्लॉक दरम्यान गिट्टी घालण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
रेल्वे ट्रॅकच्या मधोमध बंद पडला ट्रेलर
By admin | Updated: August 17, 2015 00:22 IST