तुमसर-कटंगी मार्गावरची घटना : वृक्ष पडल्याने चारचाकी बचावली, बांधकाम व वनविभागाचे दुर्लक्ष तुमसर : तुमसर-कटंगी आंतरराज्यीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एक विशालकाय वृक्ष उन्मळून पडल्याने सात तास वाहतूक ठप्प पडली. नशिब बलवत्तर म्हणून एक चारचाकी वाहन थोडक्यात बचावले. ही घटना मध्यरात्री ११.३० वाजता घडली.तुमसर-कटंगी आंतरराज्यीय महामार्ग तुमसर तालुक्यातून सातपुडा पर्वत रांगामधून जातो. महामार्गाच्या दोन्ही बाजूला जुनी मोठी झाडे आहेत. अनेक ठिकाणी ती रस्त्यावर वाकलेल्या स्थितीत आहेत.झाडाच्या खालची माती पावसाळ्यात वाहून गेल्याने झाडांची मूळ उघडी पडली आहेत. गोबरवाही ते सुदंरटोला रस्त्यावर एक जुने महाकाय वृक्ष शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आंतरराज्यीय महामार्गावर उन्मळून पडले. या मार्गाने जाणारी एक चारचाकी वाहन या अपघातातून थोडक्यात बचावली. अन्यथा अनर्थ घडला असता. हा आंतरराज्यीय महामार्ग अत्यंत धोकादायक आहे. रस्त्यालगतच घनदाट जंगल आहे. शेकडो वर्षाची जूनी झाडे फांद्या रस्त्यावर अंथरलेल्या दिसतात. नाकाडोंगरी तथा तुमसर वनपरिक्षेत्राच्या सीमेत हे जंगल आहे. पहाटे चिखलाचे उपसरपंच दिलीप सोनवाने, माजी सरपंच किशोर हुमणे, पठाणसह सामाजिक कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील वृृक्ष दूर केले. वनविभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. सुरक्षित प्रवाशाची हमी प्रवाशांना देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा वनविभागाची आहे. परंतु याकडे येथे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
महामार्गावर सात तास वाहतूक ठप्प
By admin | Updated: August 9, 2015 00:51 IST