मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात आले. गत सहा वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू होते. राज्य शासनाच्या अखत्यारितील उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूचे काम पूर्ण झाले. रेल्वे ट्रॅकवरील उड्डाणपुलाचे बांधकाम रेल्वे प्रशासनाने केले. पुलाखालून उच्च दाब वाहिनी गेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने उड्डाणपुलाच्या वर लोखंडी जाळी बसविण्याचे कामे सुरू केली. सध्या ही कामे सुरू आहेत. परंतु ही कामे पूर्ण होण्याच्या आधीच बांधकाम विभागाने पुलावरून वाहतूक सुरू केली.
या पुलावरून चारचाकी व दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. रेल्वेच्या पुलाखाली उच्च दाब वीजवाहिन्या गेल्या आहेत. सर्वसामान्यांना येथे धोक्याची कल्पना नाही. पुलावरून वाकून पाहणे, फोटो काढणे, वीज तारांवर पाणी सोडणे, अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने उड्डाणपुलावर लोखंडी जाळी बसविण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वे प्रशासनाने ही कामे पूर्ण झाल्यानंतरच पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु सदर कामे पूर्णत्वापूर्वीच पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली.