मोहाडी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत गटसाधन केंद्रात कंत्राटीस्वरूपात काम करणारे साधन व्यक्ती व समावेशित शिक्षणाचे विषय साधन व्यक्तींना जिल्हा शिक्षण व प्रश्क्षिण संस्था (डायट) यांच्याशी संलग्न केले आहे. त्यामुळे पंचायत समितीमधील गटसाधन केंद्रात अधिकाऱ्यांना धावपळ करावी लागणार आहे.सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील ७ गट साधन केंद्रातील ४१ विषयसाधन व्यक्ती व समावेशित शिक्षणाचे १० साधन व्यक्ती यांना शासनाच्या निर्णयानुसार शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी १ आॅक्टोबर पासून संलग्न करण्यात आले आहे. राज्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची निर्मिती ही प्रामुख्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने शाळा व शिक्षकांच्या समृद्धीसाठी केली आहे. गट साधन केंद्राचे कार्य हे शैक्षणिक कामकाजाशी संबंधित आहे. त्या कार्याच्या संनियंत्रणाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाकडे देण्यात आली आहे. डाएटद्वारे सातत्याने मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार गट साधन केंद्रामध्ये सेवा देणारे ४१ विषय साधन व्यक्ती व १० विषय साधन व्यक्तीच्या सेवा डाएट भंडारा यांच्याशी जोडण्यात आल्या आहेत. कंत्राटी विषय साधन व्यक्तींच्या सेवा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांशी जोडण्यात आल्याने त्यांच्या वेतन, रजा, प्रवास इत्यादी बाबींना मंजुरी देण्याचे अधिकार प्राचार्य डाएट यांना देण्यात आले आहेत.विषय साधन व्यक्तीचे शैक्षणिक कामकाजाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. ज्यांच्या सेवा समाधानकारक असतील त्यांना सहा महिन्यांनी सेवाखंडही देण्यात येईल. वार्षिक योजना व अंदाजपत्रकातील तरतुदीच्या अधिन राहून त्यांची पुर्ननियुक्ती देण्याची कार्यवाही केली जाणार नाही. या साधन व्यक्तींना संबंधित विषयाचे, पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या नवीन संशोधन, नाविण्यपूर्ण उपक्रम तयार करणे, विशेष प्रशिक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विषय साधन व्यक्तींच्या सेवा फक्त शैक्षणिक गुणवत्ता व सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
साधनव्यक्ती ‘डाएट’च्या सेवेत
By admin | Updated: October 9, 2014 22:57 IST