जीवन आणि मृत्यू निरंतर चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याचा मृत्यू होतो, त्याच्या मृतदेहावर अग्निसंस्कार करण्याचे ठिकाण म्हणजे स्मशानघाट. तिरोडा शहरातील मुख्य स्मशानघाट म्हणून चंद्रभागा स्मशानघाटाची ओळख आहे. येथील प्रवेशद्वार सुसज्ज असून, मृतदेहांना अग्नी देण्यासाठी लाकडांची सुविधा तसेच मृतदेहांना पोहोचविण्यासाठी नगर परिषदेच्या स्वर्गरथाची व्यवस्था आहे. स्मशानघाट परिसरात भगवान शंकराचे मंदिर आहे व बाजूलाच फूलझाडांनी परिसर शोभिवंत करण्यात आला आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना बसण्याची व पाण्यासाठी बोअरवेलची सोयसुद्धा आहे; परंतु जेथे मृतदेहांवर अग्निसंस्कार केले जातात ते शेड आता जीर्ण झाले आहे. भिंती व कॉलमला मोठ्या भेगा पडल्या आहेत व तेथील गिट्टी व सिमेंट उखडले आहे. छतसुद्धा जीर्ण असून, इमारत पडल्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेने लक्ष देऊन येथील इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
तिरोडाचे स्मशानघाट विकासाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:35 IST