अड्याळ : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यासह लगतच्या अड्याळ वनपरिक्षेत्रात वाघ आणि बिबट्याने हैदोस घातला आहे. त्यांनी पाळीव प्राण्यांना लक्ष केले आहे. अड्याळ नजीकच्या परिसरात बिबट्याने एका शेळीला ठार केले असून निमगाव जवळच्या शेतात पट्टेदार वाघाने म्हशीला ठार केले. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. पवनी तालुक्यात जंगल व्याप्त परिसर असून हिंस्त्र प्राण्यांची संख्या मोठी आहे. वाघ, बिबट आदी अन्य हिंस्त्र श्वापदांना गेल्या काही दिवसांपासून या परिसरात उच्छाद मांडला आहे. केसलवाडा या जंगलव्याप्त गावातील दिपसन गायकवाड यांच्या घरासमोरच्या अंगणातील बांधलेल्या दोन शेळ्या तसेच भिक्षूक चव्हाण यांच्या मालकीच्या दोन शेळ्यांना बिबट्याने ठार केले. याच परिसरातील अन्य काही गावांमध्ये पाळीव जनावरे बिबट्याने मारली आहेत. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती व्याप्त आहे. गायकवाड व चव्हाण यांचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाने भरपाई द्यावी अशी मागणी आहे. उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यात पट्टेदार वाघाचा धुमाकुळ असून निमगाव नजीकच्या जंगलात वाघाने एक म्हैैस ठार केली. राजकोट या रिठी गावालगतच्या शेतात म्हशींना चारण्यासाठी सोडून वासुदेव सावसाकडे हे कुटुंबातील सदस्यांसह धानाची कापणी करीत असताना ही घटना घडली. सावसाकडे यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. पाहुणगाव, निमगाव, चिचखेडा ही गावे जंगलाने वेठली असून मागील दोन आठवड्यात एक पट्टेदार वाघीण या परिसरात भ्रमंती करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याच वाघीणीने म्हशीला ठार केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागरिकांचे पाळीव जनावरे वन्यप्राण्याकडून फस्त करीत असल्याने गावकरी भयभीत झाले आहे. (वार्ताहर)
वाघाची दहशत
By admin | Updated: November 23, 2014 23:13 IST