शोककळा : ऐन उमेदीत गमवावा लागला जीव, वायुगळतीतील जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरुभंडारा : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. यात पवनी तालुक्यातील मांगली येथे विषारी वायुगळतीमुळे एकाचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी घरुन फिरायला गेलेल्या जवाहरनगर येथील एका तरुणाचा मृतदेह सिरसघाट वैनगंगा नदी पात्रात आढळून आला तर तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे रेल्वेतील अभियंत्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.वायुगळतीने इसमाचा विहिरीत मृत्यूपालोरा येथील घटना : एक अत्यवस्थपालोरा (चौ.) : मोटारपंप दुरुस्तीसाठी शेतातील विहिरीत उतरलेल्या एका ३५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मनोहर मानापुरे रा.मांगली (चौ.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रवी बावनकर (३२) रा. मांगली या शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर पवनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.माहितीनुसार, मनोहर मानापुरे हे स्वत:च्या शेतात रवी बावनकर याला घेऊन शेतातील विहिरीतील नादुरुस्त पंप दुरुस्तीसाठी गेले होते. सर्वात प्रथम मनोहर हे विहिरीत उतरले. विषारी वायुमुळे श्वास गुदमरल्यामुळे त्यांनी ओरडायला सुरुवात केली. त्यांना वाचविण्यासाठी रवी विहिरीत उतरला. त्याचीही स्थिती अवस्था झाली. दोघांनी आरडाओरड केल्यामुळे शेजारच्या अन्य शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. दोघानाही विहिरीबाहेर काढण्यात आले. तोपर्यंत मनोहर मानापुरे यांचा मृत्यू झाला होता. रवीला पवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मृत मनोहर मानापुरे यांच्यामागे वृध्द आईवडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेने मांगली गावात शोककळा पसरली. याप्रकरणी पवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. (वार्ताहर)‘त्या’ बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळलासिरसघाट येथील घटना : संशयास्पद मृत्यूजवाहरनगर : ठाणा पेट्रोलपंप येथील बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय प्रतीक शिवदास रंगारी या तरुणाचा सिरसघाट वैनगंगा नदीपात्रात मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवारला सकाळी उघडकीस आली. सोमवारी प्रतीक हा घराला कुलूप लावून शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला चावी देऊन फिरायला गेला. मात्र तो न परतल्याने त्याच्या आई-वडिलांनी शोध घेतला. प्रतीक हा कोंंढी येथे १२ वी विज्ञान शाखेत शिकत आहे. दरम्यान सिरसघाट नदीपात्रात एका शेतकऱ्याला पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. याची माहिती तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षांना दिली. त्यांनी कारधा पोलिसांना सांगितले. त्यानंतर ही माहिती जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली. त्या माहितीवरुन जवाहरनगर पोलिसांनी १७ वर्षीय तरुण बेपत्ता असल्याचे सांगितले. ही माहिती रंगारी कुटूंबियांना देण्यात आली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने करदोळा व चपलामुळे त्याच्या मोठया भावाने ओळखले. प्रतिकचा मृत्यू नेमका कशाने झाला, त्याला कुणी मारले काय? या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. पोलिसांच्या तपासात मृत्यूची कारणे मिळतील. याप्रकरणी कारधा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. (वार्ताहर)दुचाकी अपघातात रेल्वे अभियंता ठारदेव्हाडी येथील घटना : नाहक गेला बळीतुमसर : तुमसरहून देव्हाडीकडे दुचाकीने परतताना एका सायकलस्वारास पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात इसम गंभीररित्या जखमी झाला. रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. प्रदीप गुप्ता (३२) रा. तुमसर रोड असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास देव्हाडी शिवारात घडली. रेल्वेत अभियंता असलेले प्रदीप गुप्ता हे तुमसरवरुन दुचाकीने तुमसर रोड येथे परतताना देव्हाडी शिवारात एका सायकल स्वारास धडक लागली. त्यामुळे दुचाकी अनियंत्रीत झाली. दुचाकीसह गुप्ता रस्त्यावर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाला. अपघाताची माहिती होताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. उपचाराकरिता रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. दोन वर्षापुर्वी गुप्ता हे तुमसर रोड येथे रेल्वे विभागात अभियंता या पदावर रुजू झाले होते. तत्पूर्वी ते बैंगलोर येथे तिकीट तपासणीस पदावर कार्यरत होते. गुप्ता हे मुळचे उत्तर प्रदेशातील बलीया येथील रहिवाशी आहेत. अपघात स्थळावर तीन दिवसापूर्वी उडाणपूल बायपास रस्त्याचे काम सुरु झाले. रात्री समोरुन येणाऱ्या वाहनाच्या लाईटमुळे त्यांना वाहन दिसले नसावे, असे पोलिसांनी सांगितले. या मार्गावर आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. यात अनेकांना नाहक जीव गमावण्याची वेळ आली आहे. या मार्गावर उड्डाणपुलाची गरज आहे. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
तीन घटनेत तिघांचा मृत्यू
By admin | Updated: October 3, 2015 00:27 IST