नागझिरा व परसोडीत नागपंचमी यात्रा : सापाबद्दल गैरसमज व अंधश्रद्धा आजही कायम भंडारा : नागपंचमीला ज्या सापांची पूजा केली जाते त्याच सापांना इतर दिवशी नजरेस पडताच निर्दयीपणे मारले जाते. यामुळे दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत आहे. सापांबद्दल आजही मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे. बदलत्या काळानुसार सापांबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे. कोणते साप विषारी असतात, याची माहिती जाणून न घेता आपण प्रत्येकच सापाला विषारी समजून घाबरत असतो. वस्तुस्थिती वेगळीच असते. आपल्याकडे आढळणाऱ्या सापांबद्दलची माहिती जाणून घेऊन सापांबद्दलचे गैरसमज दूर केल्यास निसर्गाचा समतोल राखणारे साप मित्रच असल्याचे दिसून येते. भंडारा जिल्ह्यात शेतीचे व जंगलांचे प्रमाण जास्त आहे. या क्षेत्रात वेगवेगळ्या जातींचे साप आढळतात. विषारी सापांमध्ये मण्यार, नाग, घोणस (टवऱ्या), पटेरी मण्यार किंवा सतरंगी साप, तणसर्प किंवा चापडा, फुरसे यासारख्या सापांचा समावेश आहे. कमी विषारी सापांच्या प्रजातीमध्ये फोर्स्टेन मांजऱ्या वाईन स्नेक मांजऱ्या हे साप आढळतात. या सापांनी चावा घेतला तरी माणूस दगावत नाही, केवळ भोवळ येते. याशिवाय अजगर, धामण, डुरक्या घोणस किंवा मांडवळ, धोंड्या, तास्या, वास्या, कवड्या, पटेरी कवड्या, कुकरी, रातसर्प पोवळा बिनविषारी साप सर्वत्र आढळतात. जून-जुलै महिन्यात नाग, मण्यार हे विषारी साप जास्त दिसतात. त्यापैकी न्युरोटॉक्सिक व्हेनम हे विष मण्यार, पटेरी मण्यार, नाग या सापांमध्ये आढळते. हे विष मानवी शरीराच्या ‘नर्व्हस सिस्टम’वर परिणाम करते. त्यामुळे हृदय, मेंदू काम करीत नाही आणि मनुष्याचा मृत्यू होतो. ‘हिमोटॉक्सिक व्हेनम’ हे विष घोणस, तणसर्प किंवा चापडा, फुरसे या सापांमध्ये असते. हे विष रक्तातील पेशी खराब करते, रक्ताचे पाणी बनविते. परिणामी आॅक्सिजनचा पुरवठा कमी होऊन मृत्यू होतो. यावर रूग्णालयांमध्ये उपलब्ध असलेली विषविरोधक लस दोन्ही प्रकारच्या सर्पदंशावर गुणकारी आहे. मात्र जेव्हा पॉलिव्हॅलंट लस काम करीत नाही किंवा विषाची मात्रा जास्त झाली असते तेव्हा मोनोव्हॅलंट ही विषविरोधक लस वापरली जाते. विषारी साप मोजके आहेत. योग्य उपचार घेतल्यास विषारी सापाच्या दंशानंतरही जीव वाचू शकतो. मात्र लोक मांत्रिक-वैद्याकडे जाऊन उपचार घेण्यात वेळ घालवतात. परसोडीत यात्रालाखांदूर/विरली : लाखांदूर तालुक्यातील परसोडी (नाग) येथील नागमंदिरात सर्पदंशाच्या रूग्णांना जीवनदान मिळाल्याची आख्यायिका आहे. नागपंचमीनिमित्त या मंदिरात यात्रेचे आयोजन केले जाते. यात्रेत परिसरातील हजारो भाविक आपापल्या गावातील दिंड्यासह सहभागी होऊन नागदेवतेचे दर्शन घेतात. आख्यायिकेनुसार, एका शेतकऱ्याची पत्नी टोपलीमध्ये शिदोरी घेऊन शेतावर जात होती. याचवेळी नागराजाला पकडण्यासाठी काही गारुडी त्याच्यामागे लागले. ते पाहून नागराज सैरावैरा पळू लागला. दरम्यान त्याला टोपलीत शिदोरी घेऊन जाणारी महिला दिसली. त्याने तिला आपल्या टोपलीत आश्रय देऊन त्याच्या मागावर असलेल्या गारूड्यांपासून बचाव करण्याचा विनंती केली. तिने नागराजाची विनंती मान्य करुन त्याला टोपलीत आश्रय देऊन वाचविले. नागराजाचा पाठलाग करणाऱ्या गारुड्यांनी तिला नागराजाबद्दल विचारले. तेव्हा तिने नागराज तिकडे पळाल्याचे सांगून त्याची दिशाभूल केली आणि नागराजाचे गारूड्यापासून रक्षण केले. शेतकऱ्याच्या पत्नीने गारूड्यापासून रक्षण केल्यामुळे नागराज त्या महिलेवर प्रसन्न झाले आणि तिला इच्छित वर मागण्यासाठी सांगितले. तेव्हा त्या शेतकरी महिलेने ‘‘माझ्या गावाची सीमा तुझ्या विषापासून मुक्त कर’ असा वर मागितला. नागराजाने तथास्तु म्हटले. तेव्हापासून सर्पदंशाचा रूग्ण या गावाच्या सीमेत पोहचला तरी त्याला जीवनदान मिळते. परिसरातील जनतेमध्ये या मंदिराविषयी अपार श्रध्दा असून श्रध्देला तडा गेलेला नाही. लाखांदूर, पवनी तालुक्यातील अनेक सर्पदंशाचे रूग्ण आजही येथे येतात. उल्लेखनीय म्हणजे या गावाच्या सिमेत एकही आंब्याचे झाड नाही आणि नवीन आम्रवृक्षही या गावाच्या सिमेत जगत नाही. नागपंचमीला परिसरातील भाविक दिंडी घेऊन यात्रेत सहभागी होतात. नागझिरा येथे यात्रातुमसर/गोबरवाही: तुमसर-कटंगी मार्गावरील गोबरवाही गावापासून १ किमी अंतरावर असलेल्या नागझिरा देवस्थानात नागपंचमीनिमित्त यात्रा भरते. नागझिरा देवस्थान पुरातन काळापासून प्रसिध्द आहे. सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात नागपंचमीच्या दिवशी हजारो भाविक नवस फेडतात. नागझिरा देवस्थान पर्वताच्या पायथ्याशी असून याठिकाणी नागझिरा कुंड आहे. प्राचीन काळात या परिसरात पिण्याच्या पाण्याची दयनीय स्थिती होती. गोबरवाही व परिसरातील जनता पाण्यासाठी भटकत होती. दुरवरच्या गावातून पाणी आणावे लागत असे. तेव्हा गावात एक साधू आले. गावात पाण्यासाठी त्राही-त्राही असल्याचे पाहून ते साधु म्हणाले, चला माझ्या सोबत मी तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या त्रासापासून मुक्त करतो तेव्हा गावातील लोक साधुसोबत या पहाडीजवळ आले. साधूने जवळ असलेला चिमटा ज्या जागेवर मारला त्या जागेतून पाण्याचा प्रवाह वाहू लागला. लोकांनी साधूचा जयजयकार केला व त्या पाण्याच्या कुंडातून पाणी नेऊ लागले. त्या कुंडाच्या परिसरात साप राहायचे. तिथून पाणी नेताना सापांनी कुणालाही हानी पोहचविली नाही. त्यामुळे या ठिकाणाला नागझिरा हे नाव प्रचलित झाले. या कुंडातील पाणी कधीही आटत नाही, हे विशेष. घनदाट जंगल, पहाडी, वन्यप्राणी व निसर्गरम्य वातावरण असे परिपूर्ण नागझिरा देवस्थान भक्तांचे श्रध्दास्थान आहे. येथील वातावरण व कुंडातील पाणी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. भक्तांना या नागझीरा देवस्थान परिसरात अदृष्य रुपाने वास करणारे साधु महात्मा व महापुरुषाचे साक्षात दर्शन झाले. श्रावणमास नागपंचमी, रक्षाबंधन, शारदा, चैत्र, नवरात्री, मकरसंक्राती, महाशिवरात्री, हरिनाम सप्ताह, गोपालकाला, महाप्रसाद साजरे करण्यात येतात. नागपंचमीला या मंदिरात विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथून भाविक येतात. येथे मनोकामना पूर्ण होतात, असे सांगण्यात येते. गारूडीही या मंदिरात नागदेवतेची पुजा करायला येतात. वनसंपदेने नटलेल्या परिसरातील या मंदिरात शिवशंकर, दुर्गादेवी, गणेश, पार्वती, साईबाबा आणि टेकडीवर शंकरजीचे मंदिर आहे. दूध पाजू नकासाकोली : विषारी व बिनविषारी सापाबद्दल वन्यजीव अभ्यासक व सर्पमित्र संघटना जनजागृती करीत असले तरी लोकांच्या मनातून गैरसमज व अंधश्रद्धा दूर झालेले नसल्यामुळे आजही सापांना दूध पाजण्याची प्रथा समाजात आहे. नागपंचमीला दरवर्षी सापांना दूध पाजून त्यांचा नाहक बळी घेतला जात असतो. दूध हे सापाचे खाद्य नसून ते त्यास घातक आहे व त्याचा विपरित परिणाम सापांच्या यकृतावर होतो व त्यातच मृत्यू होतो. श्रद्धे-अंधश्रद्धेपोटी सापांचा जीव घेतो. गारूडी उदरनिर्वाह करण्यासाठी सापांना महिनोमहिने उपाशी ठेवून नागपंचमीच्या दिवशी लोकांसमोर आणतात व त्यावेळी त्याला दिलेला दूध हे तो पाणी समजून पितो व त्यामुळे १० ते १५ दिवसात सापाचा मृत्यू होतो. त्यामुळे सर्पमित्र व निसर्गमित्रांनी सापांना दूध पाजू नका, असे आवाहन केले आहे.नाग पुंगीवर डोलतो. साप डूक धरतो. रात्री शिटी वाजवली की साप घरात येतो. सापाने दंश केल्यावर तो उलटा फिरला की सापाचे विष शरीरात जातो. अशा अनेक गैरसमजुती समाजात बहुतांश प्रमाणात आढळून येतात. परंतु या सर्व गोष्टी खोट्या असून या लोकांच्या अंधश्रद्धा आहेत. समाजामध्ये सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मंदिरात घेऊन जातात किंवा थापडी विद्येचा प्रयोग करतात. काही ठिकाणी बाऱ्या गायल्या जातात. यात वेळ व्यर्थ जातो आणि सरतेशेवटी दवाखान्याकडे धाव घेतली जाते. विष अंगात भिनल्यामुळे दंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. वेळेचा विलंब न करता दंश झालेल्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याचे आवाहन निसर्ग संरक्षण संघटना व संवर्धन मंडळाचे गुणवंत जिभकाटे, शुभम बघेल, ग्रीन फ्रेन्डस् क्लबचे अशोक गायधने व साकोली व लाखनी येथील सर्पमित्र पथकाने आवाहन केले आहे. साप शत्रू नव्हे मित्रचभंडारा : आपल्याकडे दिसला साप की मार, असे प्रकार नेहमीच घडतात. प्रत्यक्षात साप धोकादायक आणि विषारी असले तरी त्यांच्यामुळे शेतातील उंदरांचा बंदोबस्त होऊन धान्याची नासाडी होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे साप हा पर्यावरणाचा तोल सांभाळणारा प्राणी आहे, हे लक्षात येते, मात्र केवळ काही गैरसमजुतीतून हा सरपटणारा प्राणी संपविण्याचा सपाटा मानव जातीने लावला आहे. दरवर्षी ठिकठिकाणी सर्पमित्र शेकडो सापांना वाचवून त्यांना जीवनदान देतात. बहुतांश सापाना जंगलात सोडून देण्यात येते. शेतकऱ्याचा मित्र असणारा सर्प मानवी समाजाला घातक नाही अशी नेहमी जनजागृती करण्यात येते. मात्र सापाबद्दल दहशत आजही अनेकजण बाळगून असल्याने त्याला शत्रुच समजले जाते. आज नागपंचमीच्या... या निमित्ताने सापांच्या सरंक्षणासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.
तिथे सापाचे विषही होते निष्प्रभ!
By admin | Updated: August 7, 2016 00:23 IST