भंडारा : जिल्ह्यात २ मे रोजी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडून ३ शासकीय आधारभूत केंद्रांतर्गत हमीभावात मका खरेदीचे आदेश देण्यात आले. शासनाने मका खरेदीसाठी २०९० रुपये प्रतिक्विंटलचा दर जाहीर केला आहे. मात्र, खुल्या बाजारात हमीभावापेक्षा सुमारे १५० रुपयांचा अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची संख्याही वाढता वाढेना, अशी स्थिती आहे.
भंडारा जिल्ह्यात साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड करण्यात आली. परंतु, ऐन तोडणीवेळी अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. गतवर्षी जिल्ह्यात जवळपास ९५० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली. संकटांचा ससेमिरा सहन करीत शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पादन घेतले. परंतु, विकायचा कुठे, असा प्रश्न एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कायम होता. १ मे रोजी मका खरेदीला प्रारंभ होणे गरजेचे होते. परंतु, एक दिवस उशिरा जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडून मका खरेदीचे आदेश काढण्यात आले.
तीन केेद्रांना मंजुरी, बारदाना उपलब्ध
मका खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने साकोली, लाखनी व लाखांदूर येथील तीन हमीभाव केंद्राचे आयडी ॲक्टिव्ह करण्यात आले. मका खरेदीसाठी गुदामांसह बारदाना उपलब्ध करण्यात आले. परंतु, खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केली नाही, खुल्या बाजारात अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.
ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ
मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११२ शेतकऱ्यांनी ॲपवर नोंदणी केली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना नोंदणी प्रक्रियेसाठी ३० एप्रिलपर्यंतचा कालावधी होता. परंतु, आता ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना पुरेसा अवधी उपलब्ध झाला आहे.
गतवर्षी खरेदीला मिळाला प्रतिसाद
गतवर्षी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून मका खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात केवळ तीन तालुक्यांमध्ये १८ हजार ५४९.७० क्विंटल मका खरेदी करण्यात आला होता. यात साकोली तालुक्यातील २६१ शेतकऱ्यांकडून ९९६३.८० क्विंटल, लाखनी तालुक्यातील २१५ शेतकऱ्यांकडून ८०१७.९८ क्विंटल आणि लाखांदूर तालुक्यातील ११ शेतकऱ्यांकडून ५६८ क्विंटल मका खरेदी करण्यात आला होता.