भंडारा : शहराला लागून असलेल्या भोजापूर येथे एका इसमाने अतिक्रमण केल्याचा आरोप करुन हे अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी बजरंग दल आणि हिंदू रक्षा मंचच्या सदस्यांनी केली. त्यानंतर आताच अतिक्रमण पाडण्यात यावे असा आग्रह धरल्यामुळे या परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी बळाचा सौम्य वापर करुन जमावाला शांत करावे लागले. अख्तर बेग रा.नागपूर यांचे भोजापूर येथे स्वत:चे घर आहे. भोजापूर परिसरात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना जागा देण्यासाठी बुडीत क्षेत्र राखीव करण्यात आले आहे. आजघडीला ही जागा सरकारजमा झालेली नाही. त्यामुळे शासकीय जागेवर अतिक्रमण आहे, असे म्हणता येणार नाही, असे पोलिसांचे म्हणने आहे. असे असताना हिंदू रक्षा मंच आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अतिक्रमण हटवा नाहीतर आम्हाला हटविण्याची परवानगी द्या, असा आग्रह धरला. दरम्यान बेग यांनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरीसुद्धा कार्यकर्त्यांचा हल्लाबोल सुरुच होता. पोलीस घटनास्थळी आल्यानंतरही जमाव शांत होत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करुन जमावाला शांत केले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे यांनी या कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यांचे म्हणने ऐकून घेतले. परंतु बजरंग दलाचे कार्यकर्ते हे अतिक्रमण असल्याचे सांगून प्रशासन अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप हिंदू रक्षा मंचने केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अतिक्रमणावरुन दोन गटांत तणाव
By admin | Updated: May 22, 2014 00:49 IST