नगर परिषद तुमसर येथे पाच वर्षांपासून रामटेक येथील शारदा महिला बचत गट यांना शहरातील प्रत्येक वार्डातील ओला व सुखा कचरा गोळा करण्याचे टेंडर दिले आहे. दरम्यान, कंत्राटासंबंधी तक्रारी झाल्यामुळे डिसेंबर २०१९ पासून प्रशासनाने कंत्राटदाराचे वेतन थकीत ठेवले आहे; मात्र त्याचे कंत्राट सुरूच होते. कामगारांचे वेतन कंत्राटदाराने जमेल तसे केले; मात्र गत पाच महिन्यांपासून कामगारांना त्याने वेतन देणे बंद केले आहे. जोपर्यंत मला वेतन देणार नाही, तोपर्यंत कामगारांना वेतन मिळणार नाही, अशी भूमिका कंत्राटदाराने घेतल्याने वेतनाअभावी कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्या लक्षात सदर बाब आणून देताच कारेमोरे यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व कामगारांना घेऊन नगर परिषदेवर हल्लाबोल केला; मात्र तिथे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष ,मुख्याधिकारी, कर्मचारी कुणीही हजर नव्हते. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने उपाध्यक्ष गीता कोंडेवार यांना बोलावून आंदोलनाचा समेट घडवून आणला होता; मात्र मंगळवारी
नगराध्यक्ष उपस्थित असल्याचे पाहून नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व घनकचरा व्यवस्थापन कामगारांनी हल्ला चढविला. नगराध्यक्षांच्या कक्षात शिरून ठिय्या मांडून त्यांना घेराव घातला व प्रश्नांची शरबती केली. दरम्यान, मुख्यधिकारी कक्षात येताच त्यांच्याकडे धाव घेत त्यांनाही घेराव घालून तत्काळ वेतन देयके देण्याची मागणी केली. मुख्याधिकारी जाधव यांनी तीन दिवसांत देयके देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राजेश देशमुख, निशिकांत पेठे, सुनील थोटे, प्रदीप भरनेकर, सुमित मलेवार, सुदीप ठाकूर, पमाताई ठाकूर, बाबू फुलवाधवा, गोवर्धन किरपाने, मिना गाढावे, जयश्री गभने, कविता साखरवाडे, आरती चकोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.