पालोरा (चौ.) : धानपिकाचे कोठार म्हणून पवनी तालुका प्रसिध्द आहे. या भागात सिंचनाची सोय असल्यामुळे या भागातील शेतकरी बारमाही धान पिकाचे उत्पादन घेत असतात. मात्र यावर्षी अल्प पाऊस पडल्यामुळे आतापासूनच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. अनेक मोटारपंप बंद पडल्या आहेत. उन्हाळी धानपिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. परीणामी उन्हाळी धान पिक धोक्यात आल्याने पुन्हा शेतकरी संकटात सापडलेला आहे.मागील वर्षी अल्प प्रमाणात पाणी पडल्यामुळे सर्वत्र धान पिक संकटात सापडले होते. सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र चौरास भागात याचा फटका कमी प्रमाणात पडला होता. पाऊस न पडल्यामुळे पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे विहिरीतून पाणी बाहेर निघणे कमी झाले आहे. यावर्षी पवनी तालुक्यातील पालोरा, लोणारा, बाम्हणी, मोखारा, भेंडाळा, आजगाव, वलनी, शिमनाळा, सेंद्री, आकोट, चिचाळ परिसरात मागील वर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळी धान पिक जास्त प्रमाणात आहे. उन्हाळी पिक हातात येईल शेतकरी तारेवरची कसरत करावी लागत आहे.सुरुवातीलाच धानाचे पऱ्हे वातावरणामुळे जळाले होते. तरीही शेतकऱ्यांनी मागार न घेता उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. रोवणीला महिणा पूर्ण होत नाही. तर पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे पिकाला पाणी देणे अशक्य झाले आहे. पुन्हा शेतकरी संकटात सापडलेला आहे. उन्हाळी धान पिकाला आतापासून पाणी पुरविणे अशक्य आहे. तर पुढे काय परिस्थिती राहील याबाबत अंदाज लावणे कठीण झाले आहे. पीक हातात येणार किंवा नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. (वार्ताहर)भारनियमनाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ भारनियमनाचा खरा फटका चौरास भागातील शेतकऱ्यांवर पडत आहे. दिवसेंदिवस भारनियमन वाढत आहे. सद्याला ७ ते ८ तास थ्री फेस विद्युत पुरवठा मिळत आहे. पुढे भारनियमन वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी या चौरा भागात सिंचनाच्या सोईकरीता शेतकऱ्यानी कर्ज काढून विहिरी बनविल्या आहेत. मात्र भारनियमन वाढण्याच्या संकेताने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पुन्हा शेतकरी संकटात सापडलेला आहे. निसर्ग जगू देत नाही शासन मरु देत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली अनेकदा विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. पीक हातात येणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी आशा सोडली आहे.
पाण्याअभावी उन्हाळी धान पीक धोक्यात
By admin | Updated: April 4, 2015 00:11 IST