कृती मार्गदर्शन : व्यक्तिमत्व क्षमता विकास, समुपदेशन होणारभंडारा : लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथे भंडारा पंचायत समिती, गटसाधन केंद्रांतर्गत विशेष गरजा धारक बालकांसाठी (अपंग) विशेष ग्रीष्मकालीन शिबिराचे नि:शुल्क आयोजन करण्यात आले आहे. या ग्रीष्मकालीन शिबिरामध्ये मतीमंद, अंध, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रलपाल्सी, कर्णबधीर आदी प्रकारच्या विशेष गरजाधारक बालकांचा समावेश आहे. या शिबिरामध्ये योगा, योगथेरेपी, नृत्यकला, संगीत, हस्तकला, नाट्यभिनय, क्रीडा व मनोरंजनात्मक खेळ, चित्रकला, या कलांबरोबरच अध्ययन क्षमता, फिजीओथेरेपी, वाचाउपचार, ब्रेल प्रशिक्षण, आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्यक्तिमत्व क्षमता विकास , वैयक्तिक मार्गदर्शन, पालकांना समुपदेशन या उपक्रमांचा समावेश राहणार आहे. हे शिबिर सर्व शिक्षा अभियान, गट साधन केंद्र भंडारा यांच्यामार्फत चालविण्यात येणार आहे. या शिबिरासाठी गटशिक्षणाधिकारी व्ही.पी. चरपे, वंदना गोडघाटे, चंद्रप्रभा वडे यांच्या मार्गदर्शनात विशेष शिक्षक विणा मलेवार, संगीता देशमुख, अंकीता कानतोडे, ज्योत्स्ना बोंबार्डे, सुधीर भोपे, सचिन ठाकरे, अंजू गडपाल, संघमित्रा रामटेके, शिल्पा वलके, सुजाला वाघमारे यांचेही विशेष कृती मार्गदर्शन लाभणार आहे. सदर शिबिरासाठी सर्व विशेष गरजाधारक मुलांच्या पालकांना लाल बहादूर शास्त्री विद्यायल येथे सकाळी ७.३० वाजता उपस्थित राहावे, असे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अपंग बालकांचे ग्रीष्मकालीन शिबिर
By admin | Updated: April 23, 2015 00:24 IST