मोहाडी : मोहाडी तालुक्यातील राशन दुकानातून ऐन दिवाळीच्या वेळीच साखर गायब करण्यात आली आहे. यामुळे गरीब लोकांच्या घरी बननारे मिष्ठान्न कडु झाले आहे. प्रशासनाने या दिवाळीत १६० ग्रॅम प्रति व्यक्ती साखर जास्त देण्याचे जाहीर केले होते. मात्र जास्तीची तर सोडा जे मिळत होती ती साखर सुध्दा मिळाली नाही.दिवाळी हा सण आनंदाचा सण म्हणुन साजरा केला जातो. ह्या सणात प्रत्येक घरात पाहुण्यांची रेलचेल असते. त्यामुळे गोड धोड पकवान बनविले जातात. इतर सणापेक्षा दिवाळीत साखरेची मागणी जास्त असते. अश्यावेळी गरीब लोकांना शासकीय राशन दुकानाचाच आधार असतो. प्रशासनाने यावेळी नियमित मिळणारी ५०० ग्रॅम सोबत १६० ग्रॅम अतिरिक्त साखर देण्याची घोषणा केल्याने अंतोदय, बिपीएल कार्डधारकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मोहाडी शहराला साखरेचा कोटाच मिळाला नाही. राशन दुकानदार दोन-तीन वेळा गोडावुनला जावुन परत आले. गोडावून मध्ये साखरच नाही अशा राशन दुकानदारांचे म्हणणे आहे. गरीब लोकांनी शेवटी पैशातून पैसे काढुन अर्धा किलो, एक किलो साखर खुल्या बाजारातुन खरेदी करुन दिवाळी साजरी केली. प्रशासना विरुद्ध येथील जनतेत असंतोष आहे. संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष घालुन साखर उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
ऐन दिवाळीतच राशनातून साखर गायब
By admin | Updated: October 26, 2014 22:36 IST