भंडारा येथील घटना : एकमेकांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रारी भंडारा : शहरातील गांधी चौकातील एका घर मालकाने भाडेकरूचे सामान फेकल्याचा प्रकार आज सकाळी घडला. याप्रकरणी सायंकाळी संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीराम मंदिर वॉर्डातील अनिता अशोक रोडे यांच्याकडे नफिशा रफिक शेख या मागील काही दिवसापासून भाड्याने रहात आहेत. त्या शहरातील मुख्य मार्गावर छोटे दुकान थाटून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील काही दिवसांपासून घर रिकामे करून देण्यासाठी ते सांगत होते. परंतु त्यांनी घर रिकामे केले नव्हते. दरम्यान, शनिवारला आज सकाळी घरमालक रोडे यांनी भाडेकरू नतिशा यांचे सामान बाहेर फेकले. याची तक्रार भंडारा शहर ठाण्यात करण्यात आली. दरम्यान प्रकाराने संतप्त झालेला जमाव पोलीस ठाण्यासमोर जमा झाला. त्यांनी घरमालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी लावून धरली. वृत्त लिहिपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता. याबाबत उपविभागीय अधिकारी संजय जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास असमर्थता दर्शविली.(शहर प्रतिनिधी)
संतप्त जमावाने फेकले भाडेकरूचे सामान
By admin | Updated: February 26, 2017 00:25 IST