समस्या शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता व जीर्ण इमारतीचे : कुठे आमरण उपोषण तर कुठे ठिय्या आंदोलन तुमसर : शिष्यवृत्ती तथा निर्वाहभत्ता न मिळाल्याच्या विरोधात आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शासनविरोधात एल्गार पुकारला. भंडारा जिल्ह्यातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत शासनाने निर्वाह भत्ता व शिष्यवृत्ती दिली नाही. या विरोधात तालुकास्तरावर विद्यार्थ्यांनी गुरुवारपासून आमरण उपोषण सुरु केले. तुमसर येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी गुरुवारी भंडारा येथील प्रकल्प कार्यालयात धडक दिली. शासनाच्या आदिवासी विकास विभागाने वसतिगृहात वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता दिला नाही. भंडारा जिल्ह्यातील सर्वच आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची हीच स्थिती स्थिती आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, साकोली, भंडारा, लाखांदूर व पवनी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी तालुकास्थळी गुरुवारपासून आमरण उपोषण सुरु केले. आदिवासी बांधवांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्याकरिता तालुकास्थळी शासकीय वसतिगृह सुुर करण्यात आले. या वसतिगृहाच्या इमारती बहुतांश भाड्याच्या आहेत. काही इमारती जीर्ण झाल्या आहेत. जीव धोक्यात घालून तिथे विद्यार्थ्यांना वास्तव करावे लागत आहे. भंडारा येथे आदिवासी आघाडीच्या प्रतिनिधींनी प्रकल्प कार्यालय गाठले. तेव्हा प्रकल्प अधिकारी मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंबादे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यंशी संपर्क साधून माहिती दिली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थी व प्रतिनिधींना दोन दिवसांचा अवधी मागितला. समस्या निराकरणाचे आश्वासने दिले. आदिवासी विद्यार्थ्यांनी जोपर्यंत शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता मिळणार नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार व्यक्त केला. शिष्टमंडळात अशोक उईके, दिनेश इथापे, नागेश कळपते, शिशुपाल खंडाते, दिनेश मरस्कोल्हे, विकास मरस्कोल्हे, राम आहाळे, रवी पंधरे, संदीप उईके, रविंद्र धुर्वे सह विद्यार्थ्यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा एल्गार
By admin | Updated: July 29, 2016 00:34 IST