वसतिगृहातील घटना : तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरूतुमसर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतीगृहातील ३५ विद्यार्थ्यांना कावीळची लागण झाली आहे. या आजारी विद्यार्थ्यांना तुमसर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दूषित पाण्यामुळे कावीळची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गोवर्धन नगरातील एका खाजगी इमारतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृह आहे. ७५ विद्यार्थीक्षमता असलेल्या या वसतीगृहात सध्या ३५ विद्यार्थी राहत आहेत. दूषित पाण्याच्या सेवनामुळे या विद्यार्थ्यांना काविळची लागण झाली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना उलटी होणे, मळमळ वाटणे, डोळे पिवळसर होणे, ताप येणे अशी लक्षणे दिसून आली. कमी वयाच्या विद्यार्थ्यांना ताप आला. ते रडत असल्यामुळे सुरक्षारक्षक चकोले यांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता ३५ पैकी २४ ते २६ विद्यार्र्थ्याना कावीळची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.यासंदर्भात वसतिगृहात संपर्क साधला असता तिथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. गृहपाल मुधोळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही. रुग्णालयात विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी सांगितले वसतिगृहात वाटर कुलर असले तरी ते बंदस्थितीत आहे. जलकुंभ स्वच्छ करण्यात आलेला नसल्यामुळे आहे ते पाणी प्यावे लागत होते. तापाची लक्षणे दिसल्यामुळे काही विद्यार्थी स्वगावी निघून गेले. या वसतिगृहाचा संपूर्ण कारभार रामभरोसे आहे. घरी गेलेल्या विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांनीच घरी पाठविल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अधिकारी फिरकले नाहीज्या विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे कुटूंबिय आहेत. परंतु वसतीगृहातील कर्मचारी विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी गेले नाही. गृहपाल भंडारा येथे राहत असून त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. या वसतिगृहात खाजगी कंपनीचे एक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. असे असतानाही जिल्हास्तरावरील कोणताही अधिकारी रुग्णालयात जावून विद्यार्थ्याशी चौकशी केली नाही. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना काविळची लागण
By admin | Updated: August 11, 2014 23:43 IST