ऑनलाईन लोकमतभंडारा : शिष्यवृत्ती ही आम्हाला मिळणारी भिक नसून आमच्या हक्काची आहे, असा ध्येयवाद बाळगून सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला.या आंदोलनाचे नेतृत्व शाम भालेराव दिगांबर रामटेके यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत १८६८ कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती रक्कमेचा अपहार तसेच शिष्यवृत्तीपासून लाखो विद्यार्थी वंचित असल्याच्या निषेधार्थ हा धडक मोर्चा काढण्यात आला होता. शिष्यवृत्तीमध्ये वेळोवेळी घट तसेच वाटप न झाल्याने आजपर्यंत ५० लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी यांच्या शिष्यवृत्तीत ३० टक्के पर्यंत कमी करण्यात आली. परिणामी शासनस्तरावर शिष्यवृत्ती योजना मोडीत काढत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.सम्यक विद्यार्थी आंदोलनामार्फत करण्यात आलेल्या मागण्याअंतर्गत, शिष्यवृत्ती भ्रष्टाचाराच्या गुन्हेगारांना अटक करुन त्यांना शासन करण्यात यावे, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची उत्पन्न मर्यादा पाच लाख पर्यंत वाढविण्यात यावी, ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील उत्पन्नमर्यादा पाच लाखापर्यंत वाढवावी, इबीएस प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा १० लाखापर्यंत वाढवावी, निर्वाह भत्ता दरमहा १५०० रुपये करावा, रखडलेली शिष्यवृत्ती देण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे.
जिल्हा कचेरीवर विद्यार्थ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:10 IST