पालोरा : पवनी तालुक्यातील परिसरात धान पिकाला शेवटच्या पाण्याची अत्यंत गरज आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी भारनियमनाने त्रस्त झाले असून धान पिकाला शेवटचे पाणी देणे कठी झाले आहे. निसर्गाने हुलकावणी दिल्याने शेतात भेगा पडल्या आहेत. एकदा तरी पाणी यावे म्हणून प्रत्येक शेतकरी डोळ्यात ेतेल टाकून वाट पाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या ठिकाणाहून इंजिनद्वारे पाणी देणे सुरू आहे. पीक वाचविण्यासाठी जिवाची पर्वा न करता पाण्याचा पुरवठा करीत आहे. अपघाताला आमंत्रण देऊन शेतपिकातील धान पीक वाचविण्यासाठी धावपळ सुरू आहे.यावर्षी अनेक शेतकऱ्यांचे रोवणी झाली नाही. पऱ्हे रोवणीकरिता आले मात्र पाऊस न आल्याने रोवणी खोळंबली होती. तालुक्यातील भुयार, मेंढेगाव, निष्ठी, आमगाव, निलज, बेटाळा परिसरात ५० टक्के पेक्षा कमी रोवणी झाली. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली त्या शेतकऱ्यांचे हलके जातीचे पीक असल्याने लोंबीवर आला आहे. पाणी नसल्यामुळे धानपीक संकटात सापडले आहेत. नाले, बोड्या तलाव यावर्षी पाण्याने भरले नाही. धान पिकाला कसे वाचवावे, अशा प्रश्नाच्या भडीमाराने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. यावर्षी १०० ते १५० रूपये मजुरी देऊन शेतकऱ्यांनी रोवणी केली. निंदन काढले, महागडे खत, औषधीचा वापर केला मात्र एका पाण्याने धानपीक धोक्यात आले आहे. (वार्ताहर)
धानपीक वाचविण्यासाठी धडपड
By admin | Updated: October 7, 2014 23:29 IST