कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून यासाठी ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी गावात जनजागृती करताच नागरिक व व्यावसायिकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. संचारबंदी, लॉकडाऊन घोषित करण्यात येत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. असे असले तरी कोरोना संसर्ग कालावधीत मृत्यूचे अधिक प्रमाण वाढले असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. सिहोरा परिसरातील गावातही मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाने नागरिकांत भीती वाढली आहे. कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी पुढाकार घेतला आहे. सोबतीला आरोग्य, सामाजिक संघटना, पंचायत विभाग असल्याने गावातील कोरोना साखळी तोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात नागरिकांची सदैव रेलचेल राहात आहे. मध्य प्रदेशातील नागरिक साहित्य खरेदी करण्यासाठी छुप्या मार्गाने येत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी परिसरातील व्यावसायिकांना कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यात सहभागी करून घेतले आहे. व्यावसायिकांनी यात सहभाग घेतल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गावातही शुकशुकाट दिसून येत आहे. गावात कोरोना पॉझिटिव्ह असणारे रुग्ण आता निगेटिव्ह असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले आहेत. खुद्द ठाणेदार नारायण तुरकुंडे हे पोलीस पथकासोबत गावातील ग्राम पंचायतच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जागृती करीत असल्याने नागरिक लसीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. सिहोरा परिसरात व्यावसायिकांनी कडेकोट बंद पुकारल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
कोट
" संचारबंदी असल्याने नियम व शर्तीच्या अधीन राहूनच व्यावसायिक तथा नागरिक कामे करीत आहेत. सर्वांचे सहकार्य चांगले मिळत आहे. आता लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. सोशल डिस्टनसिंग, मास्क, हात धुणे तथा शासन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
नारायण तुरकुंडे, सहायक पोलीस निरीक्षक, सिहोरा.