शेतकरी संकटात : विलास श्रुंगारपवार यांचा आरोपभंडारा : धान पिकांचे ३३ टक्के नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल, असे राज्य शासनाने घोषित केले होते. पंरतु भंडारा जिल्ह्यात ६० ते ६२ पैसेवारी जाहीर केल्यामुळे ही गाव ३३ टक्के निकषात बसत असूनही अद्याप एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. त्यामुळे राज्य शासन पोकळ घोषणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे, असा घणाघाती आरोप माजी राज्यमंत्री विलासराव श्रुंगारपवार यांनी केला आहे.धानाची आधारभूत केंद्रात विक्री झाल्यानंतर चार दिवसाच्या आत धानाचे चुकारे दिले जातील, असे सांगण्यात आले होते. परंतु एकाही ठिकाणी चार दिवसात पैसे देण्यात आले नाही. काही केंद्रावर महिनाभरात दिले तर काही केंद्रावरचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. याशिवाय हिवाळी अधिवेशनात प्रति क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर करण्यात आला होता. तोसुद्धा अद्याप मिळाला नसल्याचा आरोप श्रुंगारपवार यांनी केला. गोसेखुर्द धरणाच्या लाभ क्षेत्रातील आठ एकरच्यावर जमिनीच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी माध्यमांना दिलेल्या पत्रकात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या प्रक्रियेतील जाचक अटी रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु याबाबत अद्याप कुठलेही परिपत्रक राज्य शासनाकडून काढण्यात आलेले नाही. त्यामुळे फसव्या घोषणा करून जनतेची दिशाभूल करू नका, असेही श्रुंगारपवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा
By admin | Updated: March 3, 2016 00:43 IST