साकोली : तालुक्यातील रेतीघाटामधून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. नदीपात्रातील हे अवैध उत्खणन थांबविण्यात यावे, यासाठी ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेच्या वतीने खा. प्रफुल पटेल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात जिल्हा खनिकर्म अधिकारी व तहसिलदार साकोली यांना यासंबंधी सुचना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. साकोली तालुक्यातील धर्मापुरी, लव्हारी, महालगाव असे तीन रेतीघाटांचे लिलाव करण्यात आले आहे. यातील धर्मापुरी घाटातील एक हजार ७०० ब्रॉस व लव्हारी घाटातील एक हजार २०० ब्रॉस रेतीचा लिलाव करण्यात आला आहे. घरकुल बांधकामाच्या प्रमाणात रेतीघाटांचे करण्यात आलेले लिलाव फारच कमी आहे. परंतु ज्या कंत्राटदारांना हे रेतीघाट मिळाले तेच कंत्राटदार लिलाव केलेल्या रेतीघाटा व्यतिरिक्त इतर घाटांमधून रेतीचा उपसा करीत आहे. यामुळे गरजू ट्रॅक्टर मालक व मजुरांना काम मिळत नाही. रेतीघाटाचा ठेकेदार रॉयल्टी देत नसल्यामुळे ते कारवाईसाठी पात्र आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूल केल्या जातो. अशा कारवाईमुळेही उपासमारीच्या संकटाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे हा सगळा प्रकार बंद करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष कैलास गेडाम, उपाध्यक्ष दुर्याेधन करंजेकर, मोहन बोरकर, उदेभान चांदेवार, भोजराज भेंडारकर, अॅड. प्रदीप मोटघरे, रोशन वाघमारे, संजय खोटेले, टोलीराम बावनकुळे, परमानंद कापसे, अविनाश खोटेले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
नदीपात्रातील अवैध खणन थांबवा
By admin | Updated: April 2, 2015 00:55 IST