भंडारा : तालुक्यातील नविन निर्माण झालेल्या खोकरला जिल्हा परिषद क्षेत्रातील गाव परिसरात संबंधित विभागाने रोजगार हमी योजनेची कामे सुुरु करुन गरजू मजुरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी माजी उपसरपंच लक्ष्मण मेश्राम यांनी केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास या विरोधात आंदोलन करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असा इशारा दिला आहे.रोजगार हमी योजनेच्या नियमानुसार मजूरांना शंभर दिवस रोजगार उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. पंरतु संबंधित विभागाचे तकलादू धोरण व पूर्वनियोजनाचा अभाव यामुळे रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्यास अतिविलंब होत असल्याने मजूरांना रोजगारासाठी वनवन भटकावे लागत असुन गावपरिसरात रोजगार मिळत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. ही गंभीरबाब आहे. रोजगार हमी योजनेच्या अटी, शर्ती व नियमाचे भंग करण्याचे कारण काय? विहित कालावधीत रोजगार हमी योजनेची कामे सुरु होत नसल्याने मजूरांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. शंभर दिवस काम उपलब्ध करुन देण्याच्या योजनेकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? खोकरला जिल्हा परिषद क्षेत्रात रोहयोची कामे सुरु करण्याची मागणी आहे. प्रशासकिय कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार काय? असा सवालही माजी उपसरपंच लक्ष्मण मेश्राम यानी उपस्थित केला आहे. खोकरला जिल्हापरिषद क्षेत्रातील भोजापूर, उमरी, फुलमोगरा, अशोकनगर, मुजबी, गोपीवाडा, केसलवाडा येथे रोहयो कामे सुरु करावी अशी मागणी लक्ष्मण मेश्राम यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
रोहयोची कामे सुरु करा
By admin | Updated: May 22, 2015 01:06 IST