भूगाव येथील प्रकरण : नागरिकांची गैरसोय होणार दूर, विकासाला चालनासानगडी : सुमारे १५ ते २० गावांच्या रहदारीचे साधन आणि साकोली-लाखनी या तालुक्याला जोडणार असलेल्या भूगाव येथील पुलाचे उर्वरित काम सुरु झाले आहे.भूगाव येथील सरपंच दुधराम बारस्कर व इतर मंडळीच्या उपस्थित या पुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली. या पुलाविषयी माहिती देताना बारस्कर म्हणाले तीन वर्षापुर्वी भुगावजवळील चुलबंद नदीवर माजी सरकारने पुलाचे काम गोंदियाच्या एका कंत्राटदाराला देण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने आरसीसी पुल तयार केला. मात्र ‘अप्रोच’ रोडसाठी दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला बाजार भावाने मिळावा म्हणून आंदोलन केले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ज्या शेतकऱ्यांची जमीन अप्रोच रोडसाठी गेली. त्यांना बाजार भावाने शेतीचे पैसे दिले. मात्र विहिरगाव (बु.) येथील प्रल्हाद हरी इठवले यांनी मिळालेल्या पैशाची उचल केली नाही. इठवले यांना कोरडवाहू शेतीचे पैसे मिळाले होते. पण ओलीत शेती गृहीत धरुन पैसे देण्यात यावे म्हणून त्यांनी रितसर अर्ज सादर केला होता. त्यावेळचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी विशेष लक्ष घालून पुलाचे काम मंजुर करवून घेतले. मात्र त्यानंतर या पुलाचे काम तीन वर्षापासून रखडले. या क्षेत्रातील भाजपाचे आमदार, खासदार यांनीही पूल काँग्रेसचा काळातील असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.पुलाच्या कामाचा तिढा सुटावा व अप्रोच रोडचे काम त्वरित सुरु करावे म्हणून २ फेब्रुवारी २०१६ ला विहिरगाव भुगाव ला जोडणाऱ्या नदीपात्रातील रपट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी हा चर्चेचा मुद्दा ठरला होता.उपविभागीय अभियंता (सार्वजनिक बांधकाम) लाखांदूर, साकोली, लाखनीचे तहसीलदार यांनी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी ऐकूण यावर त्वरित तोडगा काढून येत्या दोन महिन्यात काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने त्वरित हालचाली करुन इठवले शेतकऱ्याला ओलीताचे पैसे देऊन टेंडर काढले. आता टेंडरनुसार कंत्राटदाराने १ मे २०१६ पासून काम सुरु केले आहे. मात्र कामाची गती अत्यंत धीमी असून भुगावकडील अप्रोच रोड’च्या माती फिलींगचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी एकच जेसीबी मशीन कामावर लावण्यात आली आहे. त्यातही माती आणणारे ट्रॅक्टर, ट्रक आढळले नाही. पावसाळा तोंडावर आहे. किमान कच्चे काम तरी महिनाभरात पूर्ण व्हावे. जेणेकरुन रहदारी सुरु होईल. पण प्रत्यक्षात तशी कामाची गती दिसली नाही.ठेकेदाराने आपली सर्व यंत्रणा इथे लावून १५ दिवसात माती फिलींगचे काम पुर्ण करावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)
दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरु
By admin | Updated: May 16, 2016 00:28 IST