शिवसेना कडाडली : लोकप्रतिनिधींचा घेतला खरपूस समाचारतुमसर : युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरू करा नाही तर, शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा, या दोन बाबीवरच चर्चा करण्यास तयार आहे. १३ मे रोजी बैठकीत तोडगा न निघाल्यास १४ मे पासून शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा निर्धार जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र पटले यांनी माडगी चौकात शिवसेनेच्या आंदोलनाला संबोंधित करतानी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आमदार चरण वाघमारे यांचा खरपूस समाचार घेतला.युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना मागील २० वर्षापासून कायम बंद आहे. सुमारे ११०० कामगार बेरोजगार झाले. ३०४ एकरात हा कारखाना असून सुपिक जमीन कारखानदाराने अल्प किमतीत येथे शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध सवलती या कारखाना प्रशासनाने आपल्या पदरात पाडून घेतल्या. कारखाना सुरू करा अन्यथा शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा, अशी भूमिका जिल्हा सेना प्रमुख राजेंद्र पटले यांनी मांडली.माडगी देव्हाडी चौकात दुपारी १२ वाजतापासून शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती. कारखाना व्यवस्थापनाने दोन प्रतिनिधींना मोर्चेकरांशी चर्चा करण्यात पाठविले होते. कंपनीचे कायदेविषयक सल्लागार एस. मुल्ला यांनी सांगितले की, युनिव्हर्सल कारखान्याने शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष शेती घेतल्या नाही तर खंबाटा या उद्योगपतीकडून हा कारखाना सन १९६९ मध्ये खरेदी केला होता. कारखान्याचे वीज बिल माफ झाले नाही. आंदोलन शिवसैनिकांचे नेते राजेंद्र पटले व इतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. यावर शिवसैनिकांचे समाधान झाले नाही. शिवसैनिक राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात कारखान्याकडे कूच करू लागले तेव्हा रस्त्यात त्यांना पोलिसांनी रोखले. कारखान्याचे दुसरे प्रतिनिधी कुरूप यांनी नंतर १३ मे रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले.या कारखानदाराचा दुसरा कारखाना युनिडेरीडेन्ट याच परिसरात आहे. १३ मे रोजी सकारात्मक तोडगा न निघाल्यास दुसरा कारखाना बंद करण्याचा इशारा यावेळी राजेंद्र पटले यांनी दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी कायदेविषयक सल्लागार एस. मुल्ला यांना पोलीस गाडीत बसवून सुरक्षितता प्रदान केली. एवढी काळजी व कर्तव्यतत्परता येथे दाखविण्याची गरज नव्हती, असा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. मोर्च्याला जि.प. चे माजी अध्यक्ष अॅड. वसंत एंचिलवार, सुधाकर कारेमोरे, कमलाकर निखाडे, लालु हिसारिया, प्रकाश पारधी, पं.स. सदस्य कनपटे, शेखर कोतपल्लीवार, शेखर वासानी, लाखांदूरचे प्रविण बनकर यांनी संबोधित केले. आंदोलनाला नरेश उचिबगले, हरीहर मलीक, के.सी. वहीले, शेखर वासनिक, अक्षय ढेंगे, संदीप भगत, भास्कर भोयर, दिनेश पांडे, जगदीश त्रिभूवनकर, अनिमेत रहांगडाले, अमोल खवास, लोकेश बम्हलोटे, विक्रम तिवारी, प्रेस चौधरीसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. तहसीलदार डी.टी. सोनवाने, नायब तहसीलदार एन.पी. गोंड, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस निरीक्षक, किशोर गवई यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)
युनिव्हर्सल कारखाना सुरू करा
By admin | Updated: June 2, 2016 02:02 IST