भंडारा : जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी विकासाच्या कामास प्राधान्य देऊन जिल्ह्यासाठी आलेला निधी सामान्य लोकांच्या सुविधावर खर्च करावा. तसेच जिल्ह्यातील गरिबीतील गरीब विद्यार्थी तो आदिवासी असो वा मागासवर्गीय त्यांना राहण्याच्या दृष्टीने अनेक सुविधा पूरक वसतिगृह सर्व तालुकास्तरावर त्वरीत बांधकाम सुरू करा, असे निर्देश खासदार नाना पटोले यांनी दिले.यावेळी खा. नाना पटोले यांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी मडावी यांना वसतिगृहाबाबत विचारणा केली असता जिल्ह्यात नऊ वसतिगृहे आहेत. त्या वसतिगृहात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. आदिवासी विभागाने तुमसर, साकोली येथील वसतिगृहे इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास पाहिजे असलेली मान्यतेची पूर्तता करून देण्याचे आदेश दिले. निधी कमी पडत असल्यास निधी उपलब्ध करून देऊ, असे खा. पटोले यांनी सांगितले. मागासवर्गीय वसतिगृहे बांधकामाबाबत आढावा घेताना सामाजिक न्याय विभागाचे धारगावे यांना विचारणा केली. जागेअभावी बांधकाम सुरू करता आले नाही. त्यामुळे तुमसरचे उपविभागीय अधिकारी शिल्पा सानुले यांना निर्देश दिले. जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी जेणे करून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. याची दक्षता घ्यावा. तसेच जिल्ह्यात आलेला निधी विकास कामावर खर्च करावा जेणे करून निधी परत जाता कामा नये अशा सूचना खा. पटोले यांनी दिल्या. जिल्ह्यात अजुन आदिवासी वसतिगृह सहाची आवश्यकता आहे तर मागासवर्गीय वसतिगृह पाच भाड्याने घेतले आहे. (प्रतिनिधी)
मागासवर्गीय, आदिवासी वसतिगृह बांधकाम सुरू करा
By admin | Updated: December 27, 2015 00:53 IST