आर्यन्स ग्रुपचे आयोजन : युवा क्रीडा मंडळाने घेतला सहभागलाखांदूर : जन्मत: दोन्ही हाताचे अपंगत्व जोपासताना माय-बापाचे थोर उपकार म्हणीत ट्रॅक्टरपासून परिवहन महामंडळाची बस चालविणाऱ्या पूर्णत: अपंग तरूणाने पायाने हार्माेनियम वाजवीत ‘आई माझी मायेचा सागर’ असे म्हणताच अनेकांचे डोळे पाणावले. आर्यन्स करंडक विदर्भस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेतील हा प्रसंग अनुभवताना युवा क्रीडा मंडळाअंतर्गत उद्घाटनीय कार्यक्रमात या गीताने श्रोते भारावले होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, मनोज बागडे, अॅड. वसंत एंचिलवार, नगरसेवक रामचंद्र राऊत, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, शुद्धोमता नंदागवळी, लता प्रधान, बालकिसन गोडशेलवार, रमेश पारधी, गोपाल मेंढे, प्रा. उद्धव रंगारी, सभापती मंगला बगमारे, शकुनतला भैय्या, मेहबुब पठाण, दामोधर पारधी उपस्थित होते. दोन दिवसीय या खुली मराठी एकांकीका स्पर्धेत येथील युवा क्रीडा मंडळाने सहभाग घेताना सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या सादरीकरणात जन्मत: दोन्ही हातांनी अपंग असलेल्या चुळाराम ठाकरे नामक तरूणाने पायाने हार्माेनियमचे वादन करून 'आई माझी मायेचा सागर,दिला तिने जीवना आधार,आई वडील माझे थोर,काय सांगू त्याचे उपकारजीवनाच्या वाटेवरती,किती असतो त्यांचा आधार'हे गाणे ऐकून अनेक श्रोत्यांचे डोळे पाणावलेले होते. आर्यन्स करंडक खुली मराठी एकांकीका स्पर्धेचे हे चौथे वर्ष असताना येथील युवा क्रीडा मंडळाचा सहभाग महत्वपूर्ण ठरला. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती व गोंदिया जिल्ह्यातून विविध प्रबोधनात्मक एकांकीचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमांतर्गत लाखांदूर तालुक्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी दिनेश परशुरामकर यांचा सत्कार करण्यात आला. या रंगतदार सोहळ्याचे प्रास्ताविक अॅड. धम्मदीप रंगारी यांनी केले. संचालन विशाल मस्के यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
‘आई मायेचा सागर’ म्हणताच पाणावले डोळे
By admin | Updated: February 13, 2016 00:23 IST