सोनी (चप्राड) : रात्री आपल्या आईसोबत झोपलेल्या एका पाच वर्षीय बालकाला झोपेतच सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्याच्या सोनी चप्राड येथे रविवारी रात्री घडली.रमन भरत दिघोरी (५) असे मृत बालकाचे नाव आहे. सोनी येथील शिवाजीनगर नवीन वसाहतीत त्याचे घर आहे. रमन हा अंगणवाडीचा विद्यार्थी असून वर्गात सर्वात चुनचुणीत होता. रविवारी रात्री जेवण झाल्यावर आजी-आजोबा, आईसोबत तो नेहमीप्रमाणे झोपी गेला. रात्री ११ वाजताच्या दरम्यान विषारी सापाने त्याला दंश केला. झोपेत असल्यामुळे सापाचा दंश कळायला वेळ लागला. त्यामुळे सापाचे विष रमनच्या संपूर्ण अंगात भिंडले आणि त्याचा मृत्यू झाला. निरागस रमनचा मृत्यू झाल्याचे कळताच गावात प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होता. आईचा आक्रोश हृदय हेलावून सोडविणारा होता. पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
सोनी येथे झोपेत सर्पदंश झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:32 IST