जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक : नाना पटोले यांच्या अधिकाऱ्यांना सूचनाभंडारा : जनता ही देव आहे. त्यांची सेवा करण्यासाठी सर्व विभाग काम करीत आहे. यापुढे जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खा. नाना पटोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत केंद्रीय योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, आमदार बाळा काशीवार, जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते.ग्रामीण पेयजल योजनांचा आढावा घेताना ते म्हणाले, ज्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण होवून अद्याप हस्तांतरीत झालेल्या नाही, त्या योजना सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आराखडा तयार करावा, अशा योजनांची तांत्रिक उपयोगिता, योजनेची सद्यस्थिती याची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे सांगितले. यावेळी तुमसर पंचायत समितीचे सभापती कलाम शेख यांनी चांदमारा गावाजवळील टोलीमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार केली. याबाबीची शहानिशा करून तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी,, असे निर्देश खा. पटोले यांनी दिले.राष्ट्रीय सामाजिक कार्यक्रमा अंतर्गत निराधार लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सहाय अनुदानाचा आढावा त्यांनी घेतला. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. तसेच काही पदे दीर्घकाळ न भरल्यामुळे बंद झाली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली. रिक्त पदे भरण्यासाठी २० नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यासमवेत होणाऱ्या बैठकीत हा विषय ठेवणार असल्याचे सांगितले. याशिवाय चुकीच्या कागदपत्राच्या आधारे निराधार, गरजूंच्या सुरु असलेल्या योजना बंद करू नका आणि आलेल्या अर्जावर पारदर्शकरीत्या निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.इंदिरा आवास योजनेअंतर्गत ज्या दारिद्र्यरेषेखाली लाभार्थ्यांना घरकूल मिळाले नाही. त्यांची नवीन यादी तयार करावी, त्यामध्ये यादी तयार करताना लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून योग्य यादी तयार होईल याची दक्षता घ्यावी. गरीबांना घर उपलब्ध करून देताना संवेदनशीलपणे प्रश्न हाताळावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या बैठकीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य, उपजिल्हाधिकारी हरीष धार्मिक, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बंसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आडे, सुधीर वाळके, तहसीलदार हंसा मोहने, कल्याणकुमार डहाट, नरेंद्र राचेलवार, खंडविकास अधिकारी, जिल्ह्यातील प्रमुख उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
जनतेच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देऊन सोडवा
By admin | Updated: November 19, 2014 22:33 IST