विशाल रणदिवे
अडयाळ : अडयाळ ग्रामीण रुग्णालय हे भंडारा पवनी महामार्गाच्या मधोमध असून या रुग्णालयात अडयाळ व परिसरातुन रोज शेकडोंच्या संख्येने रुग्ण येतात. मात्र येथे सुविधांचा अभाव आहे. अडयाळ ग्रामीण रुग्णालयातील समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले.
अड्याळ व परिसरात दिवस रात्रीतून कुठेही अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ अडयाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात येते आणि जेव्हा केव्हा त्या अपघातग्रस्त रुग्णाला तत्काळ रेफर करण्याची वेळ येते तेव्हा बऱ्याच वेळी कधी चालक हजर राहत नाही तर कधी वाहन बरोबर राहत नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोश पाहायला मिळत असल्याने या ठिकाणी दोन रुग्णवाहिका आहेत त्या मानाने ऑन कॉल चार रुग्णवाहिका चालकांची नेमणूक करावी,रुग्णालयात नियमितपणे स्वच्छता ठेवावी,कर्मचारी भरती करावी तसेच क्षकिरण एक दिवस ऐवजी दोन दिवस ठेवण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा भंडारातर्फे करण्यात आली आहे.
यावेळी दीपक पाल,बंडू ढेंगे,सचिन लोहारे तथा प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
अडयाळ ग्रामीण रुग्णालयात आधी एकच रुग्ण वाहून नेणारी गाडी होती पण तत्कालीन आमदार रामचंद्र अवसरे यांच्या प्रयत्नातून अडयाळ ग्रामीण रुग्णालयाला तत्काळ रुग्ण वाहून नेण्यासाठी एक आणखी सुसज्ज वाहन उपलब्ध करुन देण्यात आले होते. यामुळे बराच आधार ग्रामस्थ तथा रुग्णांनासुद्धा होत आहे, यात काही शंका नाही. परंतु काही कारणास्तव जेव्हा येथील वाहनचालक उपस्थित राहू शकत नाही तर त्या दोन वाहनांचा राहून उपयोग काय? यासाठी उपाय म्हणून चार ऑन कॉल चालक ठेवण्याची मागणी बऱ्याचदा होत होती. दोन वाहने राहून एकही चालक वेळेवर हजर राहत नाही, या ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी वर्ग कमी असल्याने सुद्धा त्याचाही त्रास रूग्ण तथा येथील आरोग्य अधिकारी तथा कर्मचारी यांना होतो त्यामुळे येथील समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी यावेळी प्रहार जनशक्ती संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.