भंडारा : तुमसर तालुक्यातील माडगी येथे रेती तस्करांनी गावाच्या वेशीवरच रेतीचा अवैध साठा करून ठेवला आहे. येथे रेती तस्कर बेलगाम झाले असून कायद्याचा धाक त्यांना राहिला नाही. आम्हीच कायद्यापेक्षा मोठे या आविर्भावात सध्या येथे रेती तस्कर वावरत आहेत. रेती तस्करांच्या मुसक्या कोण आवळणार, असा प्रश्न येथे उपस्थित होतो.
माडगी येथील नदीघाटात रेती तस्करांचा ठिय्या बसविला असून दिवसाढवळ्या राजरोसपणे नदीपात्रातील रेती उपसा सुरू आहे. प्रशासनाचे याकडे माध्यमातून लक्ष गेल्यानंतरही कोणताही अधिकारी या घाटाकडे फिरकत नाही. त्यामुळे रेती तस्करांचे फावत आहे. गावाच्या वेशीवरच तस्करांनी मोठा रेती साठा केला आहे. येथून राजरोसपणे रेती यंत्राच्या साह्याने ट्रकमध्ये घालून तिची वाहतूक सुरू आहे. दिवसभर या रेती साठ्याजवळ रेती तस्करांचा वावर सुरू आहे. आमचे कुणीही काहीही करू शकत नाही या आविर्भावात ते वावरत आहेत.
महसूल प्रशासनाने हा रेतीघाट रेती तस्करांना दान दिला काय, असा प्रश्न उपस्थित होतो. घाट लिलाव नसताना रेतीचे उत्खनन करणे व वाहतूक करणे हा गुन्हा आहे; परंतु येथे रेती राजरोसपणे उत्खनन केले जात आहे. रेती चोरी करून रेती तस्कर गबर झाले आहेत. त्यांना कायद्याचा धाक नाही, तसेच त्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नसल्याने रेती उत्पन्नाचा क्रम सुरूच आहे. रेती साठ्यातून रेती जेसीबीने भरण्यात येते. यंत्राचा वापरही ते सर्रास करीत आहेत. त्यामुळे पाणी कुठेतरी मुरत असल्याचे दिसून येते. तुमसर येथे महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत; परंतु त्यांचे या रेतीघाटाकडे सातत्याने दुर्लक्ष दिसत आहे. दुर्लक्षाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. नदीपात्र पोखरून टाकल्यानंतरही या घाटाकडे कोणीही अधिकारी फिरकला नाही. या गावात महसूल प्रशासनाचे तलाठी कार्यालय आहे. तलाठी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर रेती साठा रेती तस्करांनी करून ठेवला आहे; परंतु तेही याकडे दुर्लक्ष करत आहेत. दुर्लक्षाचे कारण काय आहे. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
बॉक्स
रेतीघाटच असुरक्षित
या नदीपात्रातील रेती साठा संपल्यानंतर रेती तस्कर तालुक्यातील दुसऱ्या रेतीघाटाकडे मोर्चा वळविणार असल्याचे समजते. त्यामुळे तुमसर तालुक्यातील रेतीघाट यामुळे सुरक्षित नाहीत, हे यावरून दिसून येते. तुमसर तालुक्यात वैनगंगा व बावनथडी नदीचे विस्तृत नदी पात्र असून या नदीपात्रात मोठा रेती साठा उपलब्ध आहे. त्यामुळे या रेती तस्करांचा डोळा या रेतीवर सतत आहे. मागील काही वर्षांपासून या नदी पत्राला रेती तस्करांनी पोखरून टाकले आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय नदीपात्रातील रेती चोरून नेणे शक्यच नाही. महसूल प्रशासनाने रेती चोरी थांबावी याकरिता अनेक कायदे व नियम तयार केले; परंतु ते केवळ कागदोपत्री दिसून येत आहेत.