विरली/बु : प्राचीन काळातील बहिण-भावाच्या अतूट प्रेमाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. मात्र, लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स येथील एका बहिणीला बंधुवियोगाचे दु:ख सहन न झाल्याने भावा पाठोपाठ बहिणीनेही इहलोकांचा निरोप घेतला. या घटनेने आधुनिक काळातही जीवापाड बंधुप्रेम कायम असल्याचे दाखवून दिले. या घटनेमुळे विरली बु. येथील बागडे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त आहे.विरली/बु येथील सामाजिक कार्यकर्ते व्यंकट तुकाराम बागडे (५५) यांचे २० मे रोजी मुत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. भावाच्या निधनाची वार्ता कळताच दहेगाव माईन्स येथील थोरली बहिण उमाताई पुरूषोत्तम शेंडे (६५) यांना अतिव दु:ख झाले. भावाच्या अंत्यदर्शनासाठी ती बागडे यांचे सध्याचे निवासस्थान विठ्ठलनगर, नागपूर येथे पोहचली. लहान भावाचे पार्थिव पाहताच बाळपणी व्यंकटला अंगाखांद्यावर खेळविणाऱ्या उमातार्इंचे दु:ख उफाळून आले आणि ती बेशुद्ध पडली. तिला तातडीने धंतोली येथील श्रीकृष्णा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, अवघ्या १८ तासातच डॉक्टरांच्या उपचाराला दाद न देता २१ मे रोजी सकाळी तिने आपली इहलोकीचा निरोप घेतला. भाऊ व्यंकट यांच्या अस्थिविसर्जनानंतर बहिण उमातार्इंचे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यंकट बागडे यांच्या अंतिम इच्छेनुसार कुटूंबियांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान केले. नागपूर येथील लता मंगेशकर नेत्रपेठीचे नेत्रतज्ञ डॉ. राजेंद्र चौरागडे, डॉ. अनुराग सिंग आणि सहायक अशोक कोमणकर यांनी नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडून त्यांचे नेत्रसंकलन केले. येथील ग्राम युवक संघटना, ग्रामीण युवक विकास प्रसारक मंडळ, शारदा सार्वजनिक वाचनालय आणि ग्रामायण प्रतिष्ठानच्या उभारणीत योगदान होते. (वार्ताहर)
भावापाठोपाठ बहिणीनेही घेतला जगाचा निरोप
By admin | Updated: May 22, 2015 00:54 IST