संप मागे : लाखोंचा महसूल बुडाला, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा खासगी वाहनातून प्रवासभंडारा : राज्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील चालक वाहक, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील बसस्थानकावर शुकशुकाट पसरला आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यातील मुख्य बसस्थानका ऐवजी प्रवासी वाहतूक होत असलेल्या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी चालक वाहकांचा संप मागे घेण्यात आला असला तरी या दोन दिवसांच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळाचे लक्षावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. तुमसर : तुमसर येथे तालुका व शहर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार एसटीच्या संपामुळे शेकडो प्रवासी खाजगी वाहने व स्ववाहनाने गंतव्य स्थानावर पोहोचले. अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यांना एक प्रकारे सुगीचे दिवस आले. तुमसर आगाराला दर दिवशी पाच लाखांचा तोटा झाल्याची माहिती आहे. येथे सुमारे ८० बसगाड्या दररोज १५ हजार कि़मी. चा प्रवास करतात. राज्यव्यापी संपामुळे सामान्य प्रवाशासह विद्यार्थ्यांना व गरीबांना सर्वात जास्त फटका बसला. बसस्थानकावर शुकशुकाट जाणवला. या बंदमुळे वैध व अवैध प्रवासी वाहतुकदारांना दोन दिवसांपासून सुगीचे दिवस आले होते. राज्य शासनाने मागण्या मंजुर केल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. पवनी : येथील शहर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, वेतनवाढीकरिता व इतर मागण्यांकरीता एस.टी. वर्कर काँग्रेस (इंटक) व इतर संघटनांच्या पुढाकाराने पुकारण्यात आलेल्या संपाला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चालक वाहकांच्या संपामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मागील दोन दिवसांपासून दर दिवसप्रमाणे या आगारातून ८३ बसगाड्या व अन्य बसफेऱ्या मिळून एकूण १३२ फेऱ्या रद्द केल्या. याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी उचलला. दरम्यान शनिवारपासून बसेस पूर्ववत धावणार आहेत. (लोकमत चमू)
दोन दिवसांपासून बसस्थानकावर शुकशुकाट
By admin | Updated: December 19, 2015 00:29 IST