भंडारा : जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने यावर्षी २१ एप्रिल रोजी प्रभू श्रीरामाची शोभायात्रा न काढण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच गुढीपाडवा ते श्रीराम नवमीपर्यंत समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
शोभायात्रा समिती सदस्यांची आभासी पद्धतीने बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. समितीच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी असे नऊ दिवस विविध कार्यक्रम घेतले जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील प्रमुख चौकांमध्ये गुढी उभारली जाते. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट अधिक गडद होत असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. घरावर रोशणाई करून भगवे झेंडे लावावे असे आवाहन शोभायात्रा समितीच्या वतीने करण्यात आले. बैठकीला धनंजय दलाल, हेमंत आंबेकर, जॅकी रावलानी, किरीट पटेल, धनंजय ढगे व सदस्य उपस्थित होते.